विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सामान विशेष ठिकाणी ठेवले जाते. मात्र हे सामान कशा पद्धतीने ठेवतात, ते सुरक्षित तर राहील ना असे अनेक प्रश्न प्रवाशांच्या मनात असतात. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची नासधूस झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळेच प्रवासांना आपल्या सामानाची काळजी असणे स्वाभाविक आहे. सध्या याचसंबंधीचा एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एका सुटकेसची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाल्याचे आपण पाहू शकतो.
रेडिट या सोशल मीडिया साइटवर शेअर करण्यात आलेला हा फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या फोटोमध्ये आपण पूर्णपणे उध्वस्त झालेली सुटकेस पाहू शकतो. ही घटना ज्या प्रवाशाबरोबर घडली आहे त्याच्या भाच्याने या सुटकेसचा फोटो ऑनलाइन शेअर केला आहे. ही सुटकेस पाहून एखाद्याला वाटेल की ही फेकून द्यायची सुटकेस आहे. हा फोटो शेअर करताना या मुलाने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “उड्डाण पूर्ण झाल्यानंतर माझ्या काकांची सुटकेस.”
फोटोमध्ये आपण पाहू शकतो की या सुटकेसची अवस्था खूपच वाईट आहे. प्रवासादरम्यान, या प्रवाशाची उध्वस्त झालेली ही सुटकेस पाहून इतर प्रवाशांच्या काळजीत भर पडली आहे. दरम्यान या पोस्टवर ४,६०० हजारांहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या असून ९७ हजारांहूनही अधिक लोकांनी या पोस्टवर अपवोट्स केले आहेत. सुटकेसची ही हालत पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या पोस्टवर विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांच्या माध्यमातून युजर्सनी आपली चिंता व्यक्त केली आहे. एक व्यक्ती म्हणाली, ‘विमानतळाने सामान ठेवण्यापूर्वी बॅगचा विमा उतरवावा.’