आजकाल गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चोरीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल, याचा काहीही नेम नाही. अनेकदा चोरीच्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. आता चोरीची एक वेगळी घटना समोर आली आहे. चीनमध्ये एका कार्यालयात चोरीची घटना घडली आहे. एका चोराने शंघाई या शहरातील एका कार्यालयात चोरी केली. मात्र, यावेळी या चोराने त्या कार्यालयाच्या मालकाला त्याच्या कार्यालयामध्ये आणखी सुधारणा करण्याचा सल्ला देत एक चिठ्ठी लिहिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चोराने कार्यालयाच्या मालकाला कार्यालयातील चोरीविरोधी प्रणाली आणखी सुधारण्याचा सल्ला दिला होता.
हेही वाचा : “हेल्मेटने तारले! डोक्यावरून कार जाऊनही थोडक्यात वाचला दुचाकीस्वार, थरारक अपघाताचा Video Viral
दरम्यान, वृत्तानुसार ही घटना १७ मे रोजी घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, चोराने या कंपनीच्या आवारात घुसून घड्याळ आणि लॅपटॉप चोरला. मात्र, त्यांनी घटनास्थळी एक चिठ्ठी टाकली होती. या चिठ्ठीमध्ये कंपनीच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता चोरी करताना आतमध्ये जाण्यापूर्वी इमारतीची बाहेरील भिंत फोडल्याचं पोलिसांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. चोरांनी एक घड्याळ आणि ॲपल मॅकबुक चोरला होता. चोरांनी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मोबाईल फोन आणि लॅपटॉप घेतला. त्यानंतर ते एका डेस्कवर ठेवले. तसेच एका नोटबुकमध्ये चिठ्ठी लिहिली.
चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की, प्रिय बॉस, मी एक घड्याळ आणि लॅपटॉप घेतला. तुम्ही तुमची चोरीविरोधी प्रणाली आणखी सुधारली पाहिजे. मी सर्व फोन आणि लॅपटॉप घेतले नाहीत. कारण मला भीती होती की, यामुळे तुमच्या व्यवसायाला हानी पोहोचू शकते. तुम्हाला तुमचा लॅपटॉप आणि फोन परत हवा असल्यास माझ्याशी संपर्क साधा. एवढं लिहिल्यानंतर शेवटी चोराने आपला नंबर चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला.
यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि चोराने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेल्या फोन नंबररून चोरट्याचा माग काढला. चोरीची घटना घडल्याच्या काही तासांनंतर चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांकडून अटक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी चोराला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा बराचसा माल जप्त केला. त्यानंतर चोराची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेवर आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.