गेल्या आठवड्यात कोलकाता येथील एका कॉलेजने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं नाव टॉपर म्हणून घोषित केल्याचं समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. यावेळी बॉलिवूडची प्रसिद्ध प्ले-बॅक सिंगर नेहा कक्करचं नाव एका कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये टॉपर म्हणून झळकलंय.

शुक्रवारी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील माणिकचक कॉलेजने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी जारी केलेल्या मेरिट लिस्टमध्ये नेहा कक्करचं नाव सर्वात वरती होती. ही यादी कॉलेजच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने कॉलेज प्रशासनाने चूक दुरूस्त करत नवीन यादी जाहीर केली. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन आणि पश्चिम बंगाल पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली आहे, असे माणिकचक कॉलेज प्राचार्य अनिरुद्ध चक्रवर्ती यांनी सांगितलं. “हे काही खोडकर लोकांचं काम आहे, अशाप्रकारची नावं मेरिट लिस्टमध्ये टाकून उच्च शिक्षण प्रणाली किंवा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे”, असंही चक्रवर्ती यावेळी म्हणाले.

काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या आशुतोष कॉलेजमध्येही अभिनेत्री सनी लिओनीचं नाव वेबसाइटवर जाहीर केलेल्या मेरिट लिस्टमध्ये टॉपर म्हणून झळकलं होतं. यादीमध्ये अर्जाचा क्रमांक आणि रोल नंबरही होता. या यादीमध्ये सनी लिओनीला १२ वीच्या बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये ( बेस्ट ऑफ फोर ) १०० पैकी १०० गुण देण्यात आले होते. नंतर कॉलेजने चूक सुधारली. पण या घटनेवर स्वतः सनी लिओनीनेही ट्विट करत नेटकऱ्यांची फिरकी घेतली होती.


दरम्यान, सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे कॉलेजच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.