चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांचे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपा सरकार बनवताना दिसत आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधींचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो शेअर करत भाजपाचे नेते त्यांची खिल्ली उडवत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधींचा हा व्हिडीओ जवळपास एक महिना जुना असून ज्यामध्ये ते, “राजस्थानमध्येही सरकार जात आहे आणि छत्तीसगडमध्येही सरकार जात आहे.” असं चुकून म्हणत आहेत. यावेळी ते या दोन्ही राज्यात कॉंग्रेसचेच सरकार आहे हे विसरले होते. राहुल गांधींना आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती लगेच सुधारल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. पण हा व्हिडीओ एडिट केला असून आता तो राहुल गांधींची खिल्ली उडवण्यासाठी वापरला जात आहे. तसेच भाजपा नेते आणि समर्थक या व्हिडीओतील वक्तव्याला राहुल गांधींची भविष्यवाणी म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ –

राहुल गांधींचा हा व्हिडीओ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “राहुलजींची भविष्यवाणी खरी ठरली.” शिवाय हा व्हिडीओ एडिट करुन त्यामध्ये सध्या ट्रेंडमध्ये असणारं गाणं मोये मोये हे देखील जोडलं आहे. दरम्यान, नरेश सिंह यांनी लिहिले, “आत्म्याचा आवाज, ईश्वराचा आवाज बनला.” तर आणखी एका भाजपा समर्थकाने लिहिले, “कधी कधी देवी सरस्वतीमुळे जीभ घसरते आणि खरं बाहेर येते.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “मला विचारायचे होते की ईव्हीएम हॅक झाल्या म्हणून रडायला कधी सुरूवात करायची?” तर तिसऱ्या एकाने कमेंट केली ज्यामध्ये लिहिलं, “राहुल गांधी भाजपाचे सर्वात मोठे प्रचारक आणि समर्थक आहेत, सर्वांनी मिळून त्यांचे आभार मानले पाहिजेत.”

हेही पाहा- निवडणुकीच्या अंतिम निकालाआधीच नेत्यांचे मजेशीर मीम्स व्हायरल! सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा जल्लोष

“भाजपाचा हा शानदार विजय नरेंद्र मोदींवरील अपार श्रद्धा आणि…”

मध्य प्रदेश निवडणुकीच्या निकालांवर बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “मध्य प्रदेशातील भाजपाचा हा शानदार विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील अपार श्रद्धा आणि विश्वास दर्शवतो. त्यांनी घेतलेल्या सभा आणि त्यांनी जनतेला केलेले आवाहन लोकांच्या हृदयाला भिडले. त्यामुळेच निकालाचा कल भाजपाच्या बाजूने येत आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the assembly election 2023 results old video of rahul gandhi is going viral bjp leaders are troll him jap