दक्षिण थायलंडमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. क्राबी प्रांताच्या किनाऱ्यावर बोट बुडाल्यानंतर एक इसम तब्बल सहा तास एका फ्रिजमध्ये तरंगत होता. २३ ऑक्टोबरला ही घटना घडली. क्राबी प्रांताच्या किनारपट्टीवर बोट बुडाल्यानंतर अनत मासोयोत हा माणूस सहा तास फ्रिजमध्ये पोहत होता. अखेरीस त्याला मासेमारीच्या बोटीतून वाचवण्यात आले.

रविवारी २३ ऑक्टोबरला अनत आपली बोट घेऊन कोह लाओ हँग बेटावर मासेमारीसाठी गेला होता. यावेळी बोटीवर तो एकटाच होता आणि हवामानही स्वच्छ होते. मात्र अचानक एक मोठी लाट आली आणि त्याची बोट पाण्यात बुडाली. सुदैवाने त्याच्या बोटीमध्ये मासे ठेवण्यासाठी एक जुना फ्रिज होता. अनतने शक्कल लढवली आणि बोटीतील सर्व मासे पाण्यात टाकून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो या फ्रिजमध्ये बसला.

फायर हेअरकट करणं तरुणाच्या जीवावरच बेतलं; Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

तब्बल सहा तास तो या फ्रिजमध्ये बसून मदत मिळण्यासाठी प्रार्थना करत होता. बऱ्याच वेळानंतर मासेमारी करण्यासाठी आलेल्या काही माणसांचे लक्ष तरंगणाऱ्या फ्रिजमध्ये बसलेल्या अनतकडे गेले. या माणसांनी अनतला सुरक्षितरित्या बाहेर काढले. यावेळी नवीन जीवनदान मिळाल्याबद्दल अनत स्वतःला भाग्यवान समजत होता. तसेच त्याने त्याला वाचवणाऱ्या लोकांचे आभारही मानले.

दरम्यान, उपजीविकेचे साधनच वाहून गेल्यानंतर पुढे काय करावे असा प्रश्न अनतसमोर उभा राहिला आहे. व्हिलेज थ्रीचे गाव प्रमुख सोमसाक डेबट यांनी सांगितले की, अनतच्या बोटीचा शोध घेण्यासाठी त्यांनी एक टीम तयार केली, पण ती सापडली नाही. अनतच्या नवीन बोटीसाठी निधी उभारण्यास मदत करण्यासाठी सोमसाक यांनी स्थानिक सरकारशीही संपर्क साधला आहे.