लग्न करण्याआधी सावधान असं म्हटलं जातं, यावरुन अनेक लोक वेगवेगळे विनोददेखील करतात. पण सध्या अशी एक घटना उघडकीस आली आहे, जी पाहून खरंच लग्न करताना सावधान होण्याची गरज असल्याचं लोक म्हणत आहे. हो कारण बनारसमधील एका मुलीने आधी कोर्ट मॅरेज केले त्यानंतर घरच्यांच्या संमतीने राजस्थानमधील एका मुलासोबत लग्न केलं. लग्न धुमधडाक्यात पार पडलं सर्व विधीही पुर्ण करण्यात आले आणि रितीरिवाजांसह वधूला निरोप देण्यात आला. नवविवाहित वधू तिच्या सासरी निघाली होती. पण ४०० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर वधु नवऱ्याला सोडून मधूनच आपल्या माहेरी परतल्याची विचित्र घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बनारसमध्ये राहणाऱ्या वैष्णवी नावाच्या मुलीचा विवाह राजस्थानमधील बिकानेरमध्ये राहणाऱ्या रवीसोबत झाला होता. बिकानेरहून वरात घेऊन नवरा मुलगा बनारसला पोहोचला. वधू-वरांनी बनारस कोर्टात कुटुंबीयांची संमती घेण्याआधीच लग्न केले आणि त्यानंतर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. त्यानंतर कुटुंबीयांनी वधूचा निरोप घेतला आणि ती सासरला जायला निघाली. ७ तासांचा प्रवास केल्यानंतर बनारसपासून ४०० किमी अंतरावर असलेल्या कानपूरमधील सरसौलजवळ पोहोचली असता. तिथून पुढे आणखी ९०० किलोमीटर अंतरावर तिचं सासर असल्याचं समजलं.
हेही वाचा- जबरदस्त! ChatGPT ला विचारला प्रश्न अन् तरुणाचं नशीबच पालटलं; झाला लखपती, कसं ते जाणून घ्या
सासर खूप लांब आहे हे कळताच वधूने मागे आपल्या माहेरी जायचा विचार केला, यासाठी ती गाडी थांबण्याची वाट पाहू लागली. त्यांची गाडी पेट्रोल भरण्यासाठी सरसौलजवळ थांबवण्यात आली, यावेळी रवी आणि त्यांचे नातेवाईक गाडीतून खाली उतरून नाश्ता करायला गेले असता वैष्णवी खाली उतरून पळाली आणि जवळच उभ्या असलेल्या पोलीस पीसीआरसमोर जोरजोरात रडायला लागली. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने सांगितल, “हे लोक मला लग्न करून राजस्थानला घेऊन जात आहेत. त्यांनी आधी अलाहाबादमध्ये राहत असल्याचं सांगितल होतं, पण आता ते त्यांना राजस्थानमधील बिकानेरला घेऊन जात आहेत”
७ तासांचा प्रवास करून परतली माहेरी –
वधूने पोलिसांना सांगितले की, बनारसहून ७ तासांचा प्रवास करून ती थकली आहे. त्यामुळे मला पुढे जायचे नाही. मला माझ्या आईकडे परत जायचे आहे. यानंतर नवऱ्या मुलाने पोलिसांना कोर्ट मॅरेजची कागदपत्रे दाखवली आणि त्याने सांगितले की, मी बिकानेर येथे राहतो, वधू आणि तिच्या कुटुंबीयांना याची माहिती होती. यानंतर पोलिसांनी मुलीच्या आईला फोन केला असता त्यांनी सांगितले की, “एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून आम्ही हे लग्न केले. माझ्या मुलीला एवढ्या लांब जायचे नसेल तर तिला पुन्ही माहेरी पाठवा आम्ही लग्न मोडतो.” यानंतर पोलिसांनी वधूला बनारसला आणि वराला राजस्थानला परत पाठवले. या लग्नाची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून अनेकांनी लग्न करताना खूपच सावधनता बाळगण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.