Agastya Chauhan Death: प्रसिद्ध युट्युबर अगस्त्य चौहान याचे अपघातात निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. यमुना एक्सप्रेसवेवर ताशी ३०० किलोमीटर वेगाने रेसिंग बाइक चालवण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला. अगस्त्य चौहानचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स होते. तो आग्र्याहून दिल्लीला जात असताना यमुना एक्सप्रेसवेवर ही घटना घडली. अगस्त्यची बाईक दुभाजकाला आदळल्यानंतर त्याचे हेल्मेट तुटले व त्याला गंभीर दुखापत झाल्याने अहवालात सांगण्यात आले आहे. सद्य माहितीनुसार, अलीगढ जिल्ह्यातील टप्पल पोलीस ठाण्याने त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. नंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रेटर नोएडा येथील जेवार येथील कैलाश हॉस्पिटलला पाठवण्यात आला.
अगस्त्यने या प्रवासाला निघण्याआधी आपल्या प्रो रायडर्स या युट्युब चॅनेलवर एक व्हिडीओ टाकला होता ज्यामध्ये आपण दिल्लीला नवीन सुपरबाईक घेण्यासाठी जात आहोत असे त्याने सांगितले होते. तसेच अगस्त्यने या व्हिडिओमध्ये त्याच्या बहिणीने लंडनहून आणलेल्या गिफ्टचा बॉक्स दाखवला होता. २० दिवसांपासून हे गिफ्ट माझ्याकडे आहे पण मी अनबॉक्स केलेले नाही. आता मी दिल्लीला जाऊन हे गिफ्ट खोलून पाहणार आहे असेही त्याने म्हंटले होते. आत या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांनी दुःखी होऊन कमेंट केल्या आहेत ज्यामध्ये या गिफ्टबद्दलही वाईट वाटल्याचे लिहिलेले आहे.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अलिगढ पोलिसांनी वाहनचालकांना जबाबदारीने वाहन चालवण्याचे आणि अतिवेगाने चालण्याचे आवाहन केले. या वर्षाच्या सुरुवातीला, डेहराडून शहरातील रस्त्यावर विविध धोकादायक स्टंट्स केल्याबद्दल अगस्त्यवर भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, TOI च्या अहवालानुसार, डेहराडून ट्रॅफिक पोलिसांनी स्टंटमुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणार्या ब्लॉगर्सची यादी काढली होती, ज्यात अगस्त्य देखील एक होता.