परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही त्यावर मात करत यश मिळवण्यासाठी तुमचा खऱ्या अर्थाने कस लागतो. ही गोष्ट आहे अग्निद्विप दास या तरुणाची. पश्चिम बंगालमध्ये एका लहानशा गावात सुरु झालेला त्याचा प्रवास फ्रान्सपर्यंत पोहोचला आहे. या तरुणाची कहाणी आपल्याला ऊर्जा देणारी ठरली आहे. अग्निद्विपचे आईवडिल जन्मापासून मूकबधिर आहेत. ते टेलरिंगचे काम करतात. पश्चिम बंगालमधील सूरी या गावातील पुरंदपूर मार्केटमध्ये त्यांचे दुकान आहे. या दुकानाचे नावही त्यांनी ‘डिफ अँड डंब टेलर रुम’ असे ठेवले आहे. अग्निद्विपही हायस्कूलमध्ये असताना आपल्या आईवडिलांना काहीवेळा टेलरिंगमध्ये मदत करायचा.

रसायनशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्याने आयआयटीची प्रवेश परीक्षा पास दिली. त्यात यश मिळवत त्याने आयआयटी इंदूरमध्ये प्रवेश मिळवला. याठिकाणी पद्व्युत्तर शिक्षण घेऊन तो तिथेही पहिल्या १० मध्ये आला. त्याच्या या यशानंतर त्याला फ्रान्समधील एका विद्यापीठातून रसायनशास्त्रात संशोधन करण्यासाठी बोलावणे आले. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण केले आणि त्यावरुन त्याची निवड निश्चित झाली. फ्रान्समधील विद्यापीठाने त्याचा सगळा प्रवासखर्च उचलला. १ ऑक्टोबरपासून त्याचे संशोधनाचे काम सुरु होईल. माझ्या आयुष्यातील इतकी आनंदाची बाब मी माझ्या आई-वडिलांना सांगू शकत नाही ही अतिशय आनंदाची दुखा:ची बाब आहे.

त्याचे मामा बंशीदर दास यांनी सूरी येथे जाऊन अग्निद्विपच्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली. ते म्हणाले, त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांना झालेला आनंद दाखवून देत होते. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने अग्निद्विप याने शाळेत असताना इतरांची पुस्तके घेऊन शिक्षण केले. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याने मिळवलेले यश हे निश्चितच मोठे आहे.