आग्रामधील एका सरकारी शाळेतील शिकवणीचे तास चुकवून डान्स पार्टी करणाऱ्या शिक्षकांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओनंतर डान्स करणाऱ्या पाच शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय. शाळेत मुलं आलीच नाहीत म्हणून चक्क या पाच शिक्षिकांनी डान्स पार्टी केली होती. यात पाचही शिक्षिका सुप्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरी हिच्या ‘गज मन पानी ले चाली….’ या सुपरहिट गाण्यावर ठुमके लावले. हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन करताना दिसून येत आहे.
तपासादरम्यान, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधल्या आग्रा इथल्या आचनेरा येथील साधन परिसरातील एका प्राथमिक शाळेचा आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काही शिक्षिका वर्गात डान्स पार्टी करताना दिसून येत आहेत. त्यांच्या डान्स पार्टीचे चार व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. विभागाने तपास केल्यानंतर या डान्स पार्टी करणाऱ्या पाच शिक्षिकांवर कारवाई करत प्रभारी बीएसएने निलंबित केलं आहे.
एडीएम प्रभाकांत अवस्थी यांनी त्यांच्यावरील निलंबनाची पुष्टी केली आहे. शिक्षणाच्या मंदिरात मुलांना शिकवण्याऐवजी वर्गात डान्स पार्टी केल्याच्या प्रकरणानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोशल मीडियावर सातत्याने टीका होत होती. आता या प्रकरणात प्रभावी कारवाई करत आग्राच्या शिक्षण विभागाने पाच आरोपी शिक्षिकांना निलंबनाचा मार्ग दाखवला. त्यानंतर लोकांनी या कारवाईचे स्वागत केलं आहे.
डान्स पार्टी करणारे शिक्षक नेटकऱ्यांचं टार्गेट
आग्रा येथील शाळेच्या वर्गात डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाच शिक्षिकांना निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित शिक्षिकांमध्ये रश्मी सिसोदिया, जीविका कुमारी, अंजली यादव, सुमन कुमारी, सुधाराणी यांचा समावेश आहे. या कालावधीत शिक्षिकांनी सादर केलेले नृत्य आणि चित्रपट गीते अजिबात शिकवणारी नसल्याचे आरोपपत्रात सांगण्यात आले आहे.
यासोबतच शिक्षकांच्या या कृत्यामुळे शाळेची प्रतिष्ठाही डगमगली आहे. तपास अहवालात असेही म्हटले आहे की, शिक्षिकांनी त्यांच्या या कृत्यामुळे शिक्षकाच्या पदाचा सन्मानही दुखावला आहे. निलंबित करण्यात आलेल्या पाच शिक्षकांना वेगवेगळ्या ब्लॉक रिसोर्स सेंटरशी संलग्न करण्यात आले आहे.