हौसेला मोल नाही म्हणतात, हे वाक्य अगदी १००% सार्थकी करणाऱ्या एका मिठाईच्या दुकानात चक्क सोन्याचे घेवर बनवण्याचा विक्रम घडला आहे. येत्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ताज नगरी आग्रा मध्ये जय्यत तयारी सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून आग्रा येथील शाह मार्केट मध्ये स्थित ब्रज रसायन मिष्टान्न भांडार या दुकानात तब्ब्ल २५ हजार रुपये किलो या दरात घेवर विकला जातोय. या घेवर वर अस्सल २४ कॅरेट सोन्याची वर्ख लावलेली आहे.
अनेकांना प्रश्न पडेल की साधी २०० रुपयात मिळणारी वस्तू कोणी २५ हजारात का घेईल? पण या मिठाईच्या दुकानाचे मालक तुषार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी त्यांचे नियमित ग्राहक काहीतरी हटके भेटवस्तू द्यायची म्हणून आग्रह करत असतात. दरवर्षी ते अशीच महाग व राजेशाही मिठाई बनवून आपल्या ग्राहकांना सरप्राईज देत असतात. यंदा जेव्हा सोन्याच्या घेवरची पाककृती ठरली तेव्हा अनेकांनी खरेदीसाठी इच्छा दर्शवली. अनेक बहिणींनी आपल्या बंधुरायाला भेट म्हणून या घेवरची ऑर्डर फार आधीच देऊन ठेवली आहे.
नुसतं सोनं नाही तर घेवर मध्ये असणार हे पदार्थ..
तुषार गुप्ता सांगतात की, कोरोना नंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे, त्यात वाढ व्हावी म्हणून आम्ही घेवर मध्ये सुक्या मेव्याचा भरपूर वापर केला आहे. काजू, पिस्ता, बदाम या साऱ्यासह घेवर मध्ये पोषक तत्व समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न होता. तसेच वरून लावलेली २४ कॅरेट सोन्याची वर्ख केवळ सुशोभन म्हणून नाही, उलट सोन्यातून शरीराला मजबुती मिळते.
सोन्याच्या घेवरची झलक पहा
घेवरचे भन्नाट फ्लेव्हर
ड्राय फ्रुट शिवाय सध्या आईस्क्रीम घेवर सुद्धा अनेक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच लहान मुलांच्या आवडीचे चॉकलेट, पिस्ता, मलाई घेवर सुद्धा बरेच मागणीत आहेत. हे घेवर बनवताना मधुमेह ग्रस्त व वयस्कर मंडळींचा देखील विचार लक्षात घेत अनेक फ्लेव्हर हे शुगर फ्री देखील बनवण्यात आले आहेत.
यंदा ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. श्रावणातील अगदी महत्त्वाचा मानला जाणारा हा सण भाऊ बहिणीच्या नात्याला समर्पित असतो. तुमच्यातील प्रेम सोन्याच्या घेवर सारखेच चमकत राहो अशा शुभेच्छा!