भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवृत्तिवेतनावर घर चालवणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची नामुष्की ओढवली असतानाच एक मराठमोळा उद्योजक त्याच्या मदतीला धावून आला आहे. विनोद कांबळीने आपल्या आर्थिक संकटासंदर्भात केलेलं भाष्य आणि पैशांची गरज असल्याची माहिती दिल्यानंतर अहमदनगरमधील एका मराठमोळ्या उद्योजकाने कांबळीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे.

नक्की वाचा >> आधी मेटेंना श्रद्धांजली आणि मग त्याच स्टेजवर सपना चौधरीचे ठुमके; शिवसेना-भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत घडला प्रकार

उद्योजक संदीप थोरात यांनी कांबळीला नोकरीची ऑफर दिली आहे. सह्याद्री उद्योगसमूहाच्या फायनान्स कंपनीमध्ये चांगल्या पदावरील नोकरीची ऑफर थोरात यांनी कांबळीला दिली आहे. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना थोरात यांनी अगदी या नोकरीसाठी पगार किती असेल हेसुद्धा सांगितलं आहे. विशेष म्हणजे विनोद कांबळीवर ओढावलेल्या स्थितीबद्दल बोलताना थोरात यांनी दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचाही उल्लेख केला आहे.

कांबळीला पैशांची गरज असल्याच्या बातम्या आपण वृत्तवाहिन्यांवर पाहिल्याचा उल्लेख करत थोरात यांनी उतार वयामध्ये चांगल्या लोकांवर अशी वेळ येणं हे आपल्या सर्वांचं अपयश असल्याचं मत व्यक्त केलं आहे. “मला महाराष्ट्राचं विशेष वाटतं. महाराष्ट्रात खूप चांगल्या व्यक्ती आहेत मात्र त्यांच्या वार्धक्याच्या काळात त्यांच्यावर ही वेळ का येते मला कधीच कळलं नाही. सिंधुताई सपकाळांना देखील त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांसमोर पदर पसरुन जगावं लागलं. आज तीच वेळ विनोद कांबळींवर देखील आलेली आहे. १९९० ते २००० या कालावधीमध्ये विनोद कांबळींनी अतिशय चांगली कामगिरी करुन भारताचं नाव एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र आज त्या व्यक्तीला कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी ओढाताण करावी लागत असेल तर मला वाटतं की हे आपलं अपयश आहे,” असं थोरात यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

पुढे बोलताना थोरात यांनी, “यासंदर्भातील सर्व बातम्या मी सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरुन पाहिल्या. मला असं वाटलं की या माणासाला आपण खरोखर मदत केली पाहिजे,” असं म्हणत विनोद कांबळीला नोकरीची ऑफर दिली आहे.

” माझ्या फायनान्स कंपनीच्या मुंबईमध्ये १० ब्रँच होत आहेत. विनोद कांबळी हे फायनान्समधील नसले तरी क्रिकेट हा असा विषय आहे की त्यात मायक्रो मॅनेजमेंट चालतं. याच मायक्रो मॅनेजमेंटचा वापर या ब्रँचच्या व्यवस्थापनासाठी करता येईल. क्रिकेटमध्ये ज्या शिस्तीने काम चालतं तीच शिस्त ते या कंपनीमध्ये लावू शकतात असं मला वाटतं. म्हणून मी त्यांना एक लाख रुपये पगाराची ऑफर मुंबईमध्ये करणार आहे,” असं थोरात म्हणाले.

Story img Loader