Ahmedabad Building Fire video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे आई आपल्या मुलांसाठी काय करु शकते हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये शुक्रवारी एका बहुमजली इमारतीला आग लागली. त्यानंतर इमारतीत एकच खळबळ उडाली. रहिवाशांनी बाल्कनीतून उडी घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. खोखर सर्कलस्थित परिस्कर १ अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. आगीमुळे अडकलेल्या तीन महिलांनी आपल्या मुलांना ज्याप्रकारे वाचवलंय त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही श्वास रोखून धराल.

शुक्रवारी अहमदाबादमधील एका अपार्टमेंटमध्ये अचानक आग लागली. आग लागताच लोक जीव वाचवण्यासाठी उड्या मारू लागले. लोकांनी खिडक्यांमधून लटकून आपले प्राण वाचवले. ही घटना खोखर सर्कल येथील पारिसकर १ अपार्टमेंटमधील आहे.अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत १८ जणांना वाचवण्यात आले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे असे सांगण्यात येत आहे.

आगीमुळे संपूर्ण अपार्टमेंटमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांमध्ये घबराट पसरली. लोक जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उड्या मारू लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी एका महिलेनं आपल्या निष्पाप मुलांना खाली लटकून वाचवण्यात आले. यावेळी खाली मजल्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी मुलांना यशस्वीरित्या वाचवले. मात्र त्यानंतर या महिलेनं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी उडी मारली, सुदैवानं तिला खालच्या मजल्यावर असलेले लोक पकडू शकले अन्यथा ती पडली असती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला अक्षरश: उलटी लटकत आहे.

पाहा व्हिडीओ

परिस्कर १ अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. आग काही मिनिटांत फोफावत गेली. त्यामुळे संपूर्ण इमारतच भक्ष्यस्थानी पडली. व्हिडीओ पाहून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलंय, “शेवटी आई आईच असते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.”