Taylor Swift Statement Fact Check : अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या वणव्यामुळे भीषण आगीची घटना घडली, ज्यामुळे गेल्या आठवड्याभरात किमान २४ लोकांचा बळी गेला, तर शेकडो घरे आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या. आठवड्याभरापासून या वणव्यामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम म्हणाले की, या वणव्यामुळे लागलेल्या आगीच्या घटनेत डझनभर लोक बेपत्ता असल्याने मृतांची संख्या वाढू शकते. अमेरिकेतील या वणव्याच्या घटनेदरम्यान गायिका टेलर स्विफ्टचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
या व्हिडीओत गायिका टेलर स्विफ्ट हिने असे म्हटल्याचा दावा केला आहे की, गैर-मुस्लिम लोकदेखील उघडपणे लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियातील वणव्याची घटना ही देवाने दिलेली शिक्षा आणि देवाने घेतलेला सूड आहे, असे म्हणत आहेत.
दाव्यात पुढे असे म्हटले आहे की, ही अमेरिकन महिलादेखील वणव्याची आग गाझामधील इस्रायलच्या नरसंहाराचा आणि अमेरिकन आर्थिक मदतीचा परिणाम असल्याचे मानते. पण, खरंच गायिका टेलर स्विफ्ट हिने असं कोणतं खळबळजनक विधान केलं का, याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर हुसेन अहमदने व्हायरल दाव्यासह व्हिडीओ शेअर केला.
इतर युजर्सदेखील त्याच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओ डाउनलोड करून आणि तो ऑडिओ फाइलमध्ये रुपांतरित करून आमचा तपास सुरू केला.
यावेळी आम्ही ऑडिओ फाइल InVid टूलच्या ऑडिओ डिटेक्शनमध्ये अपलोड केली. यादरम्यान आम्हाला आढळले की, ४१ सेकंदांची ऑडिओ क्लिप व्हॉइस क्लोनिंग टेक्निकचा वापर करून बनवली गेली होती.
image.png
ट्रू मीडियाच्या डिटेक्टरनेदेखील व्हिडीओमध्ये फेरफार केल्याचे पुरावे सुचित केले.
image.png
रिव्हर्स इमेज सर्चमधून आम्हाला गायिका टेलर स्विफ्टची एक व्हिडीओ क्लिप सापडली, ही व्हिडीओ क्लिप जिमी फॅलनच्या द टुनाईट शो एपिसोडमधील होती.
व्हायरल व्हिडीओमधील दृश्ये ही या व्हिडीओत सुमारे ४ मिनिटे आणि १० सेकंदांच्या दरम्यान पाहायला मिळतात. परंतु, त्यातील ऑडिओ पूर्णपणे वेगळा होता, जिथे स्विफ्ट रिहर्सलमध्ये तिच्या संघर्षाबद्दल बोलताना दिसली.
निष्कर्ष:
गायिका टेलर स्विफ्टने गाझा नरसंहाराची शिक्षा म्हणून लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीचे वर्णन केल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडीओ एआयनिर्मित आहे. हा व्हिडीओ व्हॉइस क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला होता. हा दावा आणि व्हिडीओ बनावट आहेत.