राजकीय नेत्यांना विविध गोष्टींवरुन ट्रोल करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच तमिळनाडूतील अण्णाद्रमुकमधील एका आमदार महाशयांना त्यांच्या एका कृत्यामुळे ट्रोल करण्यात आले आहे. आता त्यांनी असे काय केले ज्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आले. तर या महाशयांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भर रस्त्यात डान्स केला. या आमदारांचा डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्ही.सी. अरुकुट्टी असे या आमदारांचे नाव असून त्यांचा नाचतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. चेन्नईमधील हे आमदार आपल्या नाचण्याच्या कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत, याआधीही त्यांच्या डान्सवरुन बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही त्यांनी केलेला डान्स गाजला होता.

अरुकुट्टी यांनी ‘झिमकी कमल’ या गाण्यावर डान्स केला आहे. आजुबाजूला लोकांचा गराडा आणि मध्यभागी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि लुंगी घालून नाचणारे अरुकुट्टी डान्स करण्यात पूर्णपणे मग्न झाल्याचे दिसत आहे. याबाबत अरुकुट्टी म्हणतात, माझ्या या डान्समुळे मला मागच्या दोन दिवसांपासून प्रचंड फोन येत आहेत. मी डान्स करताना कोणी रेकॉर्ड केले मला माहित नाही. मात्र, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही असेही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री जयललिता यांनीही माझ्या डान्सचे विशेष कौतुक केले होते, असे त्यांनी सांगितले. प्रचारादरम्यान गाणी म्हणण्याचा आणि नाचण्याचा ट्रेंड मी आणला होता. मात्र १९९१ मध्ये मला त्यासाठी जयललिता यांनी नोटीस बजावली आणि हा ट्रेंड बंद झाला. त्यानंतर १९९७ मध्ये एका चहाच्या कारखान्याच्या उद्घाटनाप्रसंगी गेलो असताना मी तिथेही डान्स केला होता. त्यावेळी जयललिता यांनी आपल्या डान्सचे कौतुक केल्याचे ते म्हणाले. त्यानंतर मला २०११ मध्ये कावंडंपलयम इथून आमदारकीचे तिकीट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader