Aimim Winning Seats Fact Check : विश्वास न्यूज: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापन झाले. पण निवडणुकीच्या निकालाशी संबंधित दावे अजूनही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.याच संदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत असल्याचे विश्वास न्यूज संस्थेला आढळून आले. या पोस्टमध्ये दावा केला जात आहे की, मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी पूर्व या महाराष्ट्रातील तिन्ही जागांवर मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने या जागांवर भाजपाप्रणित एनडीए आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. पण या जागांवर AIMIM ने विजय मिळवला आहे. या दाव्याबाबत जेव्हा विश्वास न्यूजने तपास सुरु केला तेव्हा एक वेगळचं सत्य समोर आले, ते नेमकं काय होतं जाणून घेऊ..
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडिया युजर ‘Adv Amey Athavale’ याने व्हायरल पोस्ट शेअर करताना लिहिले आहे की, “जिथे मुस्लिम मतदारांची संख्या ५१ टक्क्यांपेक्षा जास्त आहे: मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी पूर्व. यामध्ये एनडीएचा पराभव झाला. यात काही आश्चर्य नाही. पण काँग्रेसचाही पराभव झाला आणि AIMIM या जागांवर विजय मिळवला आहे.
लक्षात ठेवा की, जोपर्यंत ते बहुमतात नाहीत, तोपर्यंतच धर्मनिरपेक्षता जिवंत आहे”.
त्याच दाव्यासह इतर अनेक युजर्सही ही पोस्ट वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे.
तपास:
महाराष्ट्रातील सर्व विधानसभा जागांसाठी (२८८) एकाच टप्प्यात मतदान झाले, ज्याचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले.निकालांनुसार, बीजेपीने १३२ जागांवर विजय मिळत तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे आणि त्याच्या नेतृत्वाखालील आघाडीला (महायुती) सरकार स्थापन करण्यासाठी दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळाले आहे.
या निवडणुकांचे निकाल भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि आम्ही तिन्ही जागांचे निकाल तपासले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली होती, ज्यात भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ अनिल शिरोळे विजयी झाले. त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दत्ता बहिरट (काँग्रेस) यांचा ४७,९९३ मतांनी पराभव केला. या जागेवर एआयएमआयएमचा उमेदवार नव्हता.
त्यानंतर आम्ही भिवंडी (पूर्व) मतदारसंघाचा निकाल तपासला. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस कासम शेख यांनी शिवसेने (शिंदे गट)च्या उमेदवाराचा ६७,६७२ मतांनी पराभव केला.
तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. या मतदारसंघातून काँग्रेस आणि एआयएमआयएमने निवडणूक लढवली नाही.
तिसरा दावा मालेगाव संदर्भात करण्यात आला होता. मालेगाव सेंट्रल विधानसभा मतदारसंघातील एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक यांनी प्रतिस्पर्धी आसिफ शेख रशीद (इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्ब्ली ऑफ महाराष्ट्र) यांचा १६२ मतांनी पराभव केला.
या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार शान ए हिंद निहाल अहमद आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजीज बेग हे होते, जे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले.
त्याच वेळी, मालेगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार दादाजी दगडू भुसे (शिंदे गट) यांनी अपक्ष उमेदवार प्रमोद बंडुकाका पुरुषोत्तम बच्छाव यांचा १,०६,६०६ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात शिवसेना (उद्धव गट) आणि बहुजन समाज पक्ष तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघातून एआयएमआयएमचा एकही उमेदवार रिंगणात नव्हता.
आमच्या तपासणीतून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल पोस्टमध्ये केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. व्हायरल पोस्टमध्ये केलेल्या दाव्याबाबत आम्ही मुंबई ब्युरोचे प्रमुख ओमप्रकाश तिवारी यांच्याशी संपर्क साधला यावेळी त्यांनी पुष्टी करताना सांगितले की, केवळ मालेगाव (सेंट्रल) मतदारसंघातून एआयएमआयएमचा उमेदवार विजयी झाला आहे.
भ्रामक दाव्यांसह व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्या युजर्सच्या प्रोफाइलवरून स्पष्ट दिसतेय की, ते एखाद्या विशिष्ट विचारसरणीने प्रेरित असलेल्या पोस्ट शेअर करत आहेत.
निष्कर्ष:
महाराष्ट्रातील मालेगाव, शिवाजी नगर आणि भिवंडी (पूर्व) या तीनही विधानसभा जागांवर एआयएमआयएम जिंकल्याचा आणि या जागा भाजपा आणि काँग्रेसने गमावल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. मालेगाव सेंट्रल मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक विजयी झाले आहेत, तर भिवंडी (पूर्व)मधून समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार रईस कासम शेख विजयी झाले आहेत, तर शिवाजी नगरमधून भारतीय जनता पक्षाचे (बीजेपी) उमेदवार सिद्धार्थ अनिल शिरोळे विजयी झाले आहेत. त्यामुळे व्हायरल होणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे,
(ही कथा मूळतः विश्वास न्यूजने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता ने पुनर्प्रकाशित केली आहे.)
https://www.vishvasnews.com/politics/fact-check-viral-claim-of-aimim-winning-malegaon-shivaji-nagar-and-bhiwandi-seats-is-misleading/