Wife Pours Bleach In Coffee: आजवर आपण विम्याचे पैसे लाटण्यासाठी अनेकांनी केलेले नानाविध गुन्हे पाहिले, वाचले, ऐकले असतील. पण अलीकडेच समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारात एका ३४ वर्षीय पत्नीने चक्क आपल्याच नवऱ्याला कॉफी देऊन जीवे देण्याचा प्रयत्न केल्याचे समजतेय. अमेरिकेतील अॅरिझोना मधील एका ३४ वर्षीय महिला अनेक महिन्यांपासून रोज कॉफीमध्ये ब्लीच टाकून तिच्या नवऱ्याला प्यायला देत होती. तिच्या पतीने ज्या हुशारीने या प्लॅनचा शोध लावला आणि मग पुढे जे घडले त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मेलोडी फेलिकानो जॉन्सन या महिलेवर तिच्या पतीच्या कॉफीमध्ये ब्लिच ओतण्यावरून फर्स्ट-डिग्री हत्येचा प्रयत्न, गंभीर हल्ल्याचा प्रयत्न आणि खाण्यापिण्यात विष मिसळल्याचे आरोप लागवण्यात आले आहेत. यावरून नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत पतीने या प्रकरणाचा कसा शोध लावला याविषयी खुलासा झाला आहे. मेलोडीच्या पतीने कॉफीमध्ये ब्लिच मिसळतानाचा व्हिडीओ पोलिसांनी पाठवल्यावर हे प्रकरण उघडकीस आले होते.
CNN संलग्न KVOA ने मिळवलेल्या न्यायालयीन कागदपत्रांनुसार, रॉबी जॉन्सन पत्नी मेलोडीसह जर्मनीमध्ये राहत असताना मार्च पासून त्याला कॉफीमध्ये काहीतरी विचित्र चव जाणवू लागली होती. यूएस एअर फोर्समध्ये काम करणाऱ्या रॉबी जॉन्सनने पूल टेस्टिंग स्ट्रिप्स वापरून त्याच्या कॉफीचे निरीक्षण केल्यावर त्याला कॉफीमध्ये उच्च क्लोरीन पातळी आढळली.
सत्य उघड करण्यासाठी, रॉबी जॉन्सनने घरात एक कॅमेरा सेट केला आणि त्यात त्याला पत्नी कॉफी मेकरमध्ये काही अतिरिक्त पदार्थ टाकत असल्याचे आढळले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमेरिकेतील डेव्हिस मंथन एअर फोर्स बेसवर परत आल्यावर पोलिस अहवाल दाखल करण्यापूर्वी पुरावे गोळा करण्यासाठी त्याने पत्नीने बनवलेली कॉफी पिणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
यूएसला परत आल्यावर, रॉबी जॉन्सनने अनेक दिवस अनेककॅमेरे वापरले आणि मेलडी एका कंटेनरमध्ये ब्लीच ओतून मग ते कॉफी मेकरमध्ये ओतत असल्याचे फुटेज शूट केले. तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की ती मृत्यूपश्चात विम्याचे फायदे मिळविण्यासाठी त्याला मारण्याचा प्रयत्न करत होती.
हे ही वाचा<< KBC च्या ५० लाख रुपये विजेत्या महसूल अधिकारी ‘अमिता’ यांनी प्रशासनाला सुनावलं; राजीनामा दिला, पण २४ तासात…
दरम्यान, शुक्रवारी युक्तिवादाच्या वेळी, मेलोडी जॉन्सनने अद्याप दोषी घोषित करण्यात आलेले नाही. या प्रकरणात ६ सप्टेंबरला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर होईपर्यंत तिला पिमा काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. न्यायालयाच्या नोंदीनुसार, तिचा बॉण्ड 250,000 डॉलर वर सेट केला गेला आहे. मात्र मेलोडी जॉन्सनने अलीकडेच तिच्या कुटुंबाजवळ फिलीपिन्समध्ये घर खरेदी केल्याचे रेकॉर्ड्स पाहता ती देश सोडून पळून जाण्याची शक्यता वर्तवत बॉण्डची रक्कम वाढवण्याची मागणी रॉबीच्या वकिलांकडून केली जात आहे.