२३ ऑगस्ट रोजी संपूर्ण भारताने एक नवीन इतिहास रचला तो म्हणजे या दिवशी भारत चंद्रावर पोहोचला, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी होताच जगभरातील लोकांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन केले त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. चांद्रयान ३ च्या यशाचा संपूर्ण देशाला अभिमान असून सर्व भारतीयांनी सर्व नामवंत शास्त्रज्ञांचे आभार मानले होते. अशातच आता सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इस्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांचे प्रवाशांनी आणि एयर होस्टेसने जोरदार स्वागत केलं आहे.
freebird_pooja नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन डॉ. एस सोमनाथ यांचा विमानातील व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक एयर होस्टेस इस्रो प्रमुखांचे स्वागत करताना दिसत आहे. यावेळी ती फ्लाइटमध्ये घोषणा करताना म्हणते की, आज इस्रोचे प्रमुख श्री. डॉ. एस सोमनाथ, हे आपल्याबरोबर विमानात आहेत हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. ते आज आमच्या फ्लाइटमध्ये आहेत. सर तुम्ही विमानात आल्याचा आम्हाला खूप अभिमान आहे.” विमानात महिलेने एस. सोमनाथ आहेत हे सांगताच प्रवासी आनंदाने टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. शिवाय यावेळी दुसरी महिला क्रू मेंबर सोमनाथ यांना काही खाद्यपदार्थ ट्रे मध्ये घेऊन येते यावेळी ती त्यांना चिठ्ठी देत आहे, चिठ्ठीमध्ये त्यांचे अभिनंदन करणारा मजकूर लिहिलेला असावा.
इस्रोने संपूर्ण मानवजातीसाठी अनोखे कार्य केले आहे. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे आज प्रत्येक भारतीय अभिमानाने जगभर फिरत आहे. इस्त्रो प्रमुखांचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ३७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तर अनेक नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “एका यूजरने लिहिले आहे,देशाच्या महान शास्त्रज्ञाला सलाम.” या व्हिडिओवर कमेंट करताना आणखी एका यूजरने लिहिलं, “यांच्यामुळे देशाचे नाव रोशन झाले आहे. मनापासून शुभेच्छा.”