श्रीलंकेची गायिका योहानी दिलोका डी सिल्वा हिने गायलेलं ‘मानिके मगे हिते’ या गाण्याने साऱ्यांनाच वेड लावलंय. या गाण्यावर विमानात एका एअर हॉस्टेसने केलेला डान्स गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या एअर हॉस्टेसचं नाव आयत उर्फ आफरीन असं असून सोशल मीडियावर ती सेलिब्रिटी बनली. त्यानंतर तिच्या पुन्हा एका नव्या व्हिडीओमुळे ती चर्चेत आलीय. या व्हिडीओमधून तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेली एअर हॉस्टेस आयत उर्फ आफरीन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा नवा व्हिडीओ शेअर केलाय. विमान खाली असताना तिने एअर हॉस्टेसच्या ड्रेसमध्ये केलेल्या डान्सचा जुना व्हिडीओ तिने जोडलाय. तिच्या या गोड डान्सच्या व्हिडीओला ६० मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. हा आनंद तिच्या चाहत्यांसोबत साजरा करण्यासाठी तिने हा नवा व्हिडीओ तयार केलाय. तिच्या जुन्या व्हिडीओसोबत त्याच गाण्यावर चाहत्यांचे आभार मानणारे एक्सप्रेशन्स देत हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तिच्या चेहऱ्यावरील हवाभावाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना तिने चाहत्यांसाठी एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात तिने लिहिलंय, “मी अजूनही माझ्या मनातल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुमचे आभार मानताना शब्द सुद्धा कमी पडतायेत. तुम्हा सर्व जणांचे खूप खूप आभार… मला फक्त तुमच्या हास्यामागचं कारण व्हायचं आहे! आणि तुमचा अभिमान वाढवायचाय!” ही कॅप्शन लिहिताना तिने एक टीप देखील लिहिलीय. माझ्या पोस्टमध्ये व्यक्त केलेली मते केवळ माझी वैयक्तिक मतं आहेत आणि त्या मतांचा मी ज्या संस्थेची कर्मचारी किंवा भाग आहे त्याचं कोणतंही प्रतिनिधीत्व करत नाही.”, असं तिने या टीपमध्ये लिहिलंय. आयत उर्फ आफरीन ही इंडिगो विमान कंपनीमधील एअर हॉस्टेस आहे.
एअर हॉस्टेस आयत उर्फ आफरीन हिच्या डान्सच्या व्हायरल व्हिडीओ प्रमाणेच हा ही नवा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीला पडलाय. चाहत्यांचे आभार मानणारा तिचा हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत या व्हिडीओला ११.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर नेटिझन्स कमेंट्स सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत तिचं कौतुक करताना दिसून येत आहेत. काहींनी हार्टचे इमोजी देखील कमेंटमध्ये केले आहेत.