Air India Flight Emergency Landing at Trichy Airport : तमिळनाडूमधील त्रिचीवरून शारजाहला जाणारी एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट काही तांत्रिक समस्येमुळे तब्बल दोन तास हवेतच घिरट्या घेत होती. हे विमान पुढे जाऊ शकलं नाही. अखेर, हे विमान सुरक्षितपणे त्रिची विमानतळावर उतरवण्यात आलं. एअर इंडिया फ्लाइट नंबर AXB613 ने शुक्रवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी ५.४३ वाजता त्रिची विमानतळावरून उड्डाण केलं होतं. विमानाच्या उड्डाणानंतर काही मिनिटात विमानात तांत्रिक समस्या उद्भवल्या. त्यानंतर पायलटने विमान माघारी वळवलं. हे विमान जवळपास दोन तास आकाशात घिरट्या घालत होतं. अखेर काही वेळाने विमान त्रिची विमानतळाच्या धावपट्टीवर सुखरूप उतरवण्यात आलं.
विमानाने टेकऑफ केल्यानंतर विमानाची चाके आत गेली नाहीत. वैमानिकाने वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले तरी त्यात त्याला यश आलं नाही. यादरम्यान, वैमानिकाने त्रिची विमानतळ प्रशासनाशी संपर्क साधत विमाातील तांत्रिक बिघाडाची माहिती दिली. त्यानंतर वैमानिकाला विमान माघारी वळवण्यास सांगितलं. काही वेळ विमान आकाशात घिरट्या घेत होतं. त्यानंतर वैमानिकाने विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवलं.
हे ही वाचा >> तमिळनाडूमध्ये रेल्वेचा अपघात! म्हैसूर-दरभंगा एक्सप्रेसची मालगाडीला धडक; सुदैवाने जीवितहानी नाही
‘हेच खरे हिरो’ म्हणत लोकांकडून कौतुकाचा वर्षाव
दरम्यान, विमान सुखरुप धावपट्टीवर उतरवण्यात आल्यांतर विमानातील प्रवाशांनी व त्यांच्या नातेवाईकांनी वैमानिकांचे आभार मानले. तसेच वैमानिक विमानतळावरून त्यांच्या कारच्या दिशेने जात असताना काही माध्यमांनी त्यांचे फोटो व व्हिडीओ चित्रित केले असून ते समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी ‘हेच खरे हिरो’, अशा कमेंट्स केल्या आहेत. इक्रोम रिफादली फहमी झैनाल असं या विमानाच्या प्रमुख वैमानिकाचं नाव असून मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे असं सहपायलटचं नाव आहे. इक्रोम व मैत्रेयीवर लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे ही वाचा >> इंडिया आघाडीत बिघाडी? उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीसाठी सपा उमेदवारांची यादी जाहीर, काँग्रेसची चर्चा नाही! पुढे काय होणार?
…म्हणून विमान दोन तास आकाशात घिरट्य घालत होतं.
या घटनेची माहिती देताना एअर इंडियाने म्हटलं आहे की “त्रिचीवरून शारजाहकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील हायड्रॉलिक सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान उतरवण्यात आलं. विमानामध्ये इंधनाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने वजन कमी करण्याच्या हेतूने ते थोडा वेळ आकाशत फिरत होते. मात्र, काही मिनिटात या विमानाचे सुरक्षित लॅंडिंग करण्यात आलं. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत”.