गेल्या काही दिवसांमध्ये बाहेरून मागवलेल्या किंवा ऑर्डर केलेल्या जेवणात वा खाद्यपदार्थांमध्ये इतर विचित्र गोष्टी सापडत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका व्यक्तीने ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा आढलल्यानं खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आता आणखी एक प्रकार समोर आला असून या प्रकारामुळे पुन्हा एकदा एअर इंडिया विमान कंपनी चर्चेत आली आहे. यासंदर्भात इंडिया टुडेनं सविस्तर वृत्त दिलं आहे. बंगळुरूहून सॅन फ्रान्सिस्कोकडे जाणाऱ्या एआय १७५ या विमानावर हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
नेमकं काय घडलं Air India च्या विमानात?
सोशल मीडिया साईट एक्सवर मॅथ्यूरेस पॉल नावाच्या एका व्यक्तीने गेल्या आठवड्यात एक पोस्ट लिहिली असून ही पोस्ट आता व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मॅथ्यूरेस पॉल यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये खाद्यपदार्थ संपत आलेली एक वाटी दिसत असून त्यात तळाशी चक्क एक ब्लेड दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये वेगवेगळी खाद्यपदार्थ ठेवलेल्या प्लेट्स आणि वाट्या दिसत आहेत. या फोटोंसह मॅथ्यूरेस पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फोटो एअर इंडिया विमानात त्यांना देण्यात आलेल्या जेवणाचे आहेत.
पॉल यांनी या पोस्टमध्ये एअर इंडियाच्या विमानात दिलेल्या जेवणात चक्क ब्लेड आढळल्याचा दावा केला आहे. “एअर इंडियाचं जेवण एखाद्या चाकूप्रमाणे कापूही शकतं”, असा उल्लेख करत त्यांनी या पोस्टची सुरुवात केली आहे.
“दोन-तीन सेकंद घास चावल्यानंतर…”
“एअर इंडियाच्या विमानात मला देण्यात आलेल्या जेवणामध्ये एक गोष्ट दिसली असून ती एखाद्या ब्लेडसारखीच दिसत आहे. मी घास घेतल्यानंतर दोन ते तीन सेकंद चावल्यावरच मला ते लक्षात आलं. मी लागलीच तोंडातला घास बाहेर काढल्यामुळे काही विचित्र घडलं नाही. या सगळ्यासाठी अर्थातच एअर इंडियासाठी केटरिंग सेवा पुरवणारी कंपनी दोषी आहे. पण यामुळे माझ्या मनातील एअर इंडियाची छबी आणखीनच वाईट झाली आहे”, असं पॉल यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“हे जेवण जर एखाद्या लहान मुलाला खायला दिलं असतं तर?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर पुढची फक्त ५ सेकंद विमानातील कर्मचाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली, असंही त्यांनी पोस्टच्या खाली आलेल्या कमेंट्सला उत्तर देताना सांगितलं. दरम्यान, एअर इंडियानं या मनस्तापाची भरपाई म्हणून आपल्याला जगभरात कुठेही मोफत बिझनेस क्लासची एक ट्रिप ऑफर केल्याचा दावा पॉल यांनी केल्याचं इंडिया टुडेनं म्हटलं आहे.
एअर इंडियाच्या विमानात महिलेला दिलेल्या शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे, पोस्ट करत म्हणाली…
विमान कंपनीचं काय म्हणणं आहे?
दरम्यान, या प्रकारावर एअर इंडियाकडूनही स्पष्टीकरण आल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. “आम्ही या प्रकरणाची चौकशी केली असून जेवणात सापडलेला तुकडा हा आमच्या केटरिंग पार्टनरच्या किचनमधील भाज्या कापण्याच्या यंत्राचा असल्याचं निदर्शनास आलं आहे. सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कठोर करण्यासंदर्भात आमची त्यांच्याशी चर्चा चालू आहे”, अशी बाजू कंपनीकडून मांडण्यात आली आहे.