Air India Pilot Controversy: एअर इंडियाच्या पायलटने आपल्या खास मैत्रिणीसमोर हिरो बनण्यासाठी केलेला मोठेपणा आता त्याच्या चांगलाच अंगाशी आल्याचे समजतेय. AI 915 च्या पायलटने आपल्या मैत्रिणीसाठी बिजनेस क्लास सुविधा देण्याचे आदेश दिले होते पण बिझनेस क्लासमध्ये जागा नसल्याने त्याने चक्क मैत्रिणीला कॉकपीटमध्येच बसण्यासाठी आमंत्रण दिले होते. आता या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
केबिन क्रूच्या तक्रारीनुसार, “पायलटची मैत्रीण विमानाच्या फर्स्ट निरीक्षक सीटवर बसली होती. एवढंच नाही तर कॅप्टनने त्याच्या मैत्रिणीसाठी केबिन क्रूला रूम सजवायला सांगितले होते. शिवाय कॉकपीटमध्येच ड्रिंक्स आणि स्नॅक्सची ऑर्डर सर्व्ह करण्यास सांगितले. कॉकपिटमध्ये अल्कोहोल सर्व्ह करण्यास नकार दिल्यावर पायलट खूप भडकला आणि उद्धटपणे वागू लागला. आणि सर्वांना चाकराप्रमाणे वागवू लागला.”
क्रू मेंबरने केलेल्या आरोपानुसार, “ विमान प्रवासाच्या दरम्यान कॅप्टन उशी घेऊन झोपला होता आणि प्रभारी पायलट मागील निरीक्षक स्थानकात प्रवाशाकडे तोंड करून गप्पा मारत बसला होता. कॅप्टनने परतीच्या फ्लाइट दरम्यान तिच्यावर अश्लील टिप्पणी सुद्धा केली होती.
दरम्यान, एअरलाइनला ३ मार्चला यासंदर्भात क्रूची तक्रार मिळाली होती आणि आता एअर इंडियाच्या पायलटचा परवाना विमान वाहतूक नियामक – नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) निलंबित केल्याचे समजतेय. विमान नियम १९३७ अंतर्गत निहित अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल आणि लागू DGCA नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पायलट-इन-कमांडचा परवाना एका वर्षाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आला आहे, तसेच, फर्स्ट फ्लाईट ऑफिसरला याबाबत तक्रार न करण्यावरून दंड ठोठावला आहे.