वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा सध्या ट्वीटरवर चांगलेच चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखलं असता त्यांच्या बॅगेत असं काही आढळलं की आश्चर्य व्यक्त होत आहे. ओडिशाचे वाहतूक आयुक्त असणारे बोथरा यांनी ट्विटरला फोटो शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत. जयपूर विमानतळावर हा फोटो घेण्यात आल्याचं अरुण बोथरा यांनी सांगितलं आहे.
अरुण बोथरा प्रवास करत जयपूर विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बॅग उघडण्यास सांगितलं. स्कॅनरमध्ये त्यांच्या बॅगेत असं काहीतरी दिसत होतं ज्यावरुन सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय आला होता. पण बॅग उघडून पाहिली तर ती मटारने भरली होती.
अरुण बोथरा यांनी सांगितल्यानुसार, ४० किलो रुपये किलोच्या भावाने त्यांनी हे मटार विकत घेतले होते. मटारने भरलेली बॅग पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही काही वेळासाठी आश्चर्याचा धक्का बसला.
फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “जयपूर विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मला हॅण्डबॅग उघडून दाखवण्यास सांगितलं”.
त्यांची ही पोस्ट व्हायरल झाले असून ४८ हजारांहून अधिक जणांनी लाईक केली आहे. तसंच फोटोही प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनीदेखील विमानातून प्रवास करताना भाजी नेल्याचा अनुभव शेअर केला आहे.
वन सेवा अधिकारी प्रवीण कासवान यांनी उपहासात्मकपणे मटारची तस्करी सुरु होती का अशी विचारणा केली आहे.
अरुण बोथरा हे ओडिशा कॅडेटचे आयपीएस अधिकारी असून ट्विटरवर अॅक्टिव्ह असतात. त्याचे २.३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.