Viral Video : अनेकदा सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान सामान चोरलं जाईल याची भीती प्रत्येकाच्या मनात असते. कारण- अनेकदा चोरटे गर्दीचा फायदा घेत, चोरी करून पळ काढतात आणि आपले मोठ्या प्रमाणात नुकसान होते. रेल्वेस्थानकावर रेल्वेची, तर विमानतळावर विमानाची वाट पाहत असताना काही प्रवासी झोपलेले असतात; तर काही मोबाईलमध्ये व्यग्र असतात. मग अशा परिस्थितीत चोरट्यांना प्रवाशांना सामानाची चोरी करणं सर्वांत सोपं जातं. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. चोरांनी विमानतळावर सामान चोरण्याची एक वेगळीच पद्धत शोधून काढली आहे; जी पाहून तुम्हीदेखील काही क्षणांसाठी थक्क व्हाल.
सुरुवातीला व्हिडीओत विमानतळावर एक अज्ञात व्यक्ती स्वतःचं सामान बाजूला ठेवून कॉफी पिताना दिसत आहे आणि या संधीचा फायदा घेऊन चोरटा तिथे येतो. चोरानं एक बॅग सोबत आणलेली असते; जी खालून उघडी असते. चोरटा ही बॅग अज्ञात व्यक्तीच्या सामानावर ठेवतो आणि सामान चोरून तिथून पळ काढतो. त्यानंतर मोबाईलमध्ये व्यग्र असणाऱ्या एका दुसऱ्या अज्ञात व्यक्तीनं त्याचं सामान खाली ठेवलेलं असतं. या संधीचा फायदा घेत, चोर अज्ञात व्यक्तीच्या बॅगवर त्याची खालून उघडी असलेली बॅग ठेवतो आणि तीसुद्धा चोरून निघून जातो. त्यानंतर सामान चोरीला गेलेल्या अज्ञात व्यक्ती आपली बॅग इकडे-तिकडे बघत शोधताना तुम्हाला व्हिडीओत दिसून येतील. विमानतळावर कशा प्रकारे चोरी केली जाते हे व्हिडीओत दिसून येत आहे.
हेही वाचा… अर्धा कुत्रा अन् अर्धा कोल्हा! पहिल्यांदा आढळला हा विचित्र प्रजातीचा प्राणी, नाव आहे Dogxim
व्हिडीओ नक्की बघा :
सामान चोरण्यासाठी चोरट्यांनी शोधले नवे तंत्रज्ञान :
चोरीच्या या नव्या क्लृप्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात विमानतळावर प्रवाशांच्या नकळत चोर सहजपणे सामान उचलून पळून जात असल्याचं चित्र यात दिसून आलं आहे. या चोरट्या व्यक्तीकडे एक बॅग आहे; जी खालून उघडी आहे. ही बॅग हातात घेऊन चोरटा विमानतळावर फिरतोय आणि जिथे त्याला संधी मिळेल, त्या अज्ञात प्रवाशांच्या बॅगेवर हा चोरटा आपली बॅग ठेवून सामान चोरताना दिसत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Lifehacktipsyt या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला ‘सामान चोरी करण्याच्या नवीन तंत्रज्ञानापासून सावध राहा!’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांना चोरट्याच्या या नव्या क्लृप्तीनं चकित करून सोडलं आहे.