केरळच्या त्रिसूर महापालिकेच्या निवडणुकानंतर तेथे अजिथा विजयन (४७) महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. मात्र महापौर झाल्यानंतरही त्यांनी आपले जुने काम सोडलेलं नाही. मागील आठवड्यात महापौर पदाची शपथ घेतलेल्या अजिथा या १८ वर्षांपासून दूध विक्रीचे काम करत आहेत. महापौर झाल्यानंतरही त्यांनी हे काम सुरु ठेवण्याचे ठरवले आहे. त्यामुळेत अजिथा यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर मागील दोन आठवड्यापासून शहरामधील २०० घरांमध्ये चक्क महापौर दूध विक्रीसाठी स्वत: येत आहेत.
‘पद येते आणि जाते आपण आपले मूळ रुप बदलता काम नये’ यावर केरळच्या त्रिसूर महापालिकेच्या महापौर अजिथा यांचा विश्वास आहे. अजिथा कनीमंगलम प्रभागातून निवडून आल्या. त्यानंतर त्या थेट महापौर झाल्या. त्यांच्या शपथविधीनंतर प्रभागातील अनेकांनी आता अजिथा काही उद्यापासून दूध टाकण्यासाठी येणार नाहीत असं गृहित धरून इतरांकडून दूध घेण्यासंदर्भात विचार करु लागले. मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशीच पहाटे अजिथा आपल्या लाल रंगाच्या स्कुटीवर दूधविक्री करताना दिसल्या. नेत्याने कितीही मोठे झाले तरी अहंकार न बाळगता पाय जमिनीवरच ठेवले पाहिजे. त्यामुळे खरे लोकतंत्र समजते. लोकांच्या संपर्कात राहून त्याच्या अडचणी समजून घेता येतात असं अजिथा म्हणतात. महापौर झाले म्हणून मागील १८ वर्षांपासून करत असणारे काम सोडून देणे मला पटत नाही. प्रत्येक कामाला आपले एक महत्व असते. पद येते आणि जाते. असे असले तरी तुम्ही तुमच्या मुळांशी जोडलेले रहायला हवे असे अजिथा यांनी सांगितले.
अजिथा आणि विजयन हे दोघेही मागील २० वर्षांपासून सीपीएमचे कार्यकर्ते आहेत. को ऑप्रेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या मिल्मा या दूध वितरण केंद्र ते चालवतात. अजिथा महिन्याला आठ ते दहा हजार रुपये कमवतात. पहाटे साडेचार वाजल्यापासून माझा दिवस सुरु होतो. साडेपाच वाजता मी गाडी घेऊन दूध वाटपासाठी निघते. पुढील दोन ते तीन तासांमध्ये मी घरोघरी जाऊन दूध टाकते. महापालिकेचे कामकाज सकाळी साडे नऊ वाजता सुरु होते. त्यामुळे मग मी नंतर तिकडे जाते अशी माहिती अजिथा यांनी दिलीय. तसेच माझ्या रोजच्या दूध विक्रीच्या कामामध्ये पक्षाचे काम आड येणार नाही यासाठी मी पक्षाकडे तशाप्रकारची विनंती केली असल्याचंही अजिथा यांनी सांगितले.
महापौर झाल्यानंतर शहर महिलांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी काम करण्याचा मानस असल्याचे अजिथा सांगतात. मी दूध विक्रीच्या माध्यमातून रोज अनेकांना प्रत्यक्ष भेटते. रोज सकाळी मला शेकडो लोकं भेटतात, त्यांच्या अडचणी सांगतात. त्यामुळे महापौर म्हणून काही निर्णय घेताना मला या सर्वाचा फायदा होतो, असं अजिथांनी सांगितलं.