Akasa Air Sanskrit Announcement Video: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला व्हिडिओ आढळून आला ज्यामध्ये एका विमानाच्या आतील दृश्य पाहायला मिळत आहे. अकासा एअरच्या फ्लाइटमध्ये संस्कृत भाषेत घोषणा दिली जात असल्याचा दावा व्हिडिओसह करण्यात आला होता. यापूर्वी अनेकदा कविता म्हणून, शेरोशायरी करत वैमानिकांनी घोषणा दिल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पायलटचे आई- वडील, खास मैत्रीण विमानात प्रवास करत असल्यास त्यांसाठी खास घोषणा केल्याची सुद्धा काही उदाहरणे ऑनलाईन पाहायला मिळाली होती पण अशाप्रकारे संस्कृत मध्ये घोषणा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नेटकरी सुद्धा गोंधळून गेले होते. म्हणूनच याबाबत तपास केला असता आम्हाला सत्य स्थिती दिसून आली.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Lakshmi Narayan B.S (BHUVANAKOTE) ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील त्यांच्या हॅण्डलवर व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्चद्वारे आम्हाला ‘Sanskrit Sparrow’ या वापरकर्त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला.
कन्टेन्ट निर्मात्याने कॅप्शनमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते (भाषांतर): वरील कन्टेन्ट डब केलेला व्हॉईस ओव्हर आहे. कोणत्याही फ्लाइटमध्ये याची घोषणा करण्यात आली नाही. याचा अकासा एअरशी काहीही संबंध नाही. आम्ही क्रिएटर चे प्रोफाइल तपासले आणि आढळले की ‘समष्टी गुब्बी’ संस्कृतमध्ये व्हिडिओ तयार करतात.
तपासाच्या पुढील टप्प्यात आम्हाला Akasa Air च्या हॅण्डलवरील एक पोस्ट देखील सापडली.
Akasa Air च्या X हॅण्डलवर बहुधा पोस्ट हटवलेल्या वापरकर्त्याला प्रतिसाद देत स्पष्ट केले होते की फ्लाइट घोषणा हिंदी आणि इंग्रजीमध्ये केल्या जातात आणि व्हायरल व्हिडिओ डब केलेला आहे.
हे ही वाचा<< मूर्खपणाचा कळस! दोन तरुणांनी तरुणीसह केलेला १७ सेकंदाचा Video पाहून धडकीच भरेल; पुणेकरांनो, हे ठिकाण ओळखलंत का?
निष्कर्ष: संस्कृतमधील फ्लाइट घोषणेचा एडिटेड, डब केलेला व्हिडीओ खरा म्हणून व्हायरल होत आहे. व्हायरल दावा खोटा आहे.