प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याच्या लग्नाची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. श्लोका मेहता हिच्याशी त्याचे लग्न होणार असून ती प्रसिद्ध हिरेव्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. याचे कारण म्हणजे हे दोघेही ज्या दिवशी विवाहबंधनात अडकणार आहेत त्या दिवसाची तारीख नक्की झाली आहे. हे दोघेही ९ मार्च रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. हा लग्नसोहळा मुंबईच्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस सुरु राहणार आहे. ११ तारखेला मोठे रिसेप्शन होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. या सोहळ्याला दोन्ही कुटुंबातील लोक आणि त्यांच्या जवळचे मित्रमंडळी उपस्थित असतील.

त्याआधी आकाश अंबानी आपल्या खास मित्रमंडळींना स्वित्झर्लंडमध्ये बॅचलर्स पार्टी देणार आहेत. ही पार्टी २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान असेल असे सांगितले जात आहे. आकाशच्या या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक अभिनेते उपस्थित असतील असे म्हटले जात आहे. या पार्टीसाठी ५०० पाहुण्यांची यादी करण्यात आली आहे. या पार्टीचे आयोजन St.Moritz येथे करण्यात आले आहे. आनंद आणि श्लोका हे दोघंही एकमेकांना शाळेपासूनच ओळखतात असंही म्हटलं जात आहे. आकाश आणि श्लोका या दोघांचीही कुटुंबे पाहता त्यांच्या लग्नाचा थाट अद्वितीय असणार यात शंकाच नाही.

श्लोका मेहता हिने धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रिंस्टन युनिव्हर्सिटीतून अँथ्रोपोलॉजीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायंसची निवड केली. २०१४ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोकाने ‘रोसी ब्ल्यू फाऊंडेशन’मध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळला. इतंकच नाही, तर श्लोका ‘कनेक्ट फॉर’ या संस्थेची सहसंस्थापिकाही आहे. ही संस्था विविध एनजीओंना मदत करते.

Story img Loader