एखाद्या लग्न सोहळ्यासाठी फुलांनी सजवून सज्ज केलेली कार तुम्ही बऱ्याचदा पाहिली असेल. फोटोमध्ये दिसणारी कार तुम्हाला असा भास निर्माण करुन देणारी नक्की आहे. पण ही कार लग्नासाठी नव्हे तर चालकाचे आभार व्यक्त करण्यासाठी सजवल्याचे कळल्यानंतर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. या गाडीवरील लाल दिवा ही गाडी एका व्हिआयपीची असल्याचे स्पष्ट होते. पण गाडीमध्ये मागील सीटवर बसलेला चालक तुम्हाला बुचकळ्यात पाडेल.
सरकारी अधिकारी आपल्या वाहनाचा गैरवापर करत आहे का? असा सवालही हा फोटो पाहिल्यानंतर निर्माण होऊ शकतो. पण अकोल्यातील जिल्हाधिकाऱ्याच्या सेवेत दाखल असणाऱ्या सजविलेल्या कारची कहाणी निश्चितच थक्क करणारी अशी आहे. सजलेल्या गाडीमध्ये चालकाच्या गणवेशात मालकाच्या सीटवर बसलेल्या चालकाचे नाव दिगंबर असे आहे. गेल्या ३५ वर्षापासून हा चालक महाराष्ट्रातील अकोल्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या सेवेत रुजू होता. दिगंबर थाल नावाच्या या चालकाच्या निवृतीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला अशा प्रकारे ट्रिट केले की त्याच्या आयुष्यातील सेवा सफल झाल्याची अनुभूतीच त्यांनी दिगंबरला दिली.
अकोल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी आपल्याला सेवा देणाऱ्या चालकाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने सन्मान देत सेवानिवृत्तीच्या दिवशी भेट दिली. ३५ वर्षापासून १८ जिल्हाधिकाऱ्यांना सेवा देणाऱ्या चालकाला श्रीकांत यांनी वेगळ्या पद्धतीने सन्मान दिला. दिगंबर याचे आभार मानण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी चक्क स्वत: जिल्हाधिकारी गाडी चालवत नेहमी आपल्याला वेळेत कार्यालयात नेणाऱ्या चालकाला घेऊन आल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांना सेवा देणाऱ्या चालकाला आभार मानण्यासाठी श्रीकांत यांनी वापरलेल्या अनोख्या पद्धतीची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात चर्चा रंगली आहे.
Akola Collector G Sreekanth gave Great farewell to his driver Digambar Thak on his retirement day by driving himself.Thak was seated on back pic.twitter.com/WalWzpDXXe
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) November 4, 2016