युकेमध्ये विरोधी पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मजूर पक्षाने हुजूर पक्षाला हरवलं आहे. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मजूर पक्षाने सर्वाधिक ४०० हून जास्त जागा जिंकल्या. यामुळे हुजूर पक्ष अर्थात कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव झाला आहे. ज्यानंतर हुजूर पक्षाचे ऋषी सुनक यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याचं भाषण करत असताना त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती सुनक यादेखील त्यांच्यासह होत्या. त्यांना आता चांगलंच ट्रोल करण्यात येतं आहे. कारण ऋषी सुनक निरोपाचं भाषण करत असताना अक्षता मूर्ती ४२ हजारांचा ड्रेस परिधान करुन उभ्या होत्या.
नेमकं काय घडलं?
ऋषी सुनक हे भाषणासाठी उभे होते. त्यांनी राजीनामा देण्याआधी कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना सॉरीही म्हटलं. त्यावेळी अक्षता मूर्ती-सुनक म्हणजेच ऋषी सुनक यांच्या पत्नी या त्यांच्या मागे उभ्या होत्या. अक्षता मूर्ती या जो ड्रेस परिधान करुन उभ्या होत्या त्या ड्रेसच्या किंमतीवरुन ट्रोलर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. अक्षता मूर्ती-सुनक यांचा ड्रेस ४२ हजारांचा आहे या ड्रेसवर क्यूआर कोड आहे अशी कमेंट एकाने केली. तर काहींनी निरोपाचं भाषण करायला आलेल्या पतीसह इतका महागाचा ड्रेस परिधान करुन अक्षता मूर्ती कशा काय उभ्या राहिल्या यावरुन त्यांना ट्रोल केलं आहे. अक्षता मूर्ती या निळ्या, पांढऱ्या आणि लाल रेषा असलेल्या ड्रेसमध्ये उभ्या दिसत आहेत. मात्र अचानक त्यांचा हा ड्रेस चर्चेत आला आहे. काहींनी या ड्रेसच्या कलरवरुनही कमेंट केल्या आहेत.
ट्रोलर्स काय काय म्हणाले?
एकाने तर अशीही कमेंट केली आहे की तुम्ही जर अक्षता मूर्तींचा ड्रेस नीट निरखून पाहिला तर तुम्हाला कॅलिफोर्नियाला जाणारं विमानही त्या ड्रेसवर दिसेल. या ड्रेसवर क्यूआर कोड आहे ज्यामुळे तु्म्हाला डिस्ने लँडचा पास मिळेल असंही काहींनी म्हटलं आहे. हुजूर पक्षाच्या पराभवानंतर जेव्हा ऋषी सुनक निरोपाचं भाषण करायला उभे राहिले तेव्हा त्यांनी डाउनिंग स्ट्रीटच्या त्यांच्या कार्यालयाबाहेर उभं राहून भाषण केलं. त्यावेळी त्यांच्या मागे अक्षता मूर्ती उभ्या होत्या. ज्यांनी ४२ हजारांचा ड्रेस परिधान केला होता. त्यामुळे त्यांना ड्रेसच्या किंमतीवरुन आणि रंगसंगतीवरुन ट्रोल करण्यात आलं.
आपल्या भाषणात ऋषी सुनक काय म्हणाले?
“देशाला मी प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे सांगू इच्छितो की मला माफ करा. मी माझ्या या कामासाठी माझे सर्वस्व दिले आहे, परंतु तुम्ही स्पष्ट संकेत पाठवले आहेत की युनायटेड किंगडमचे सरकार बदलले पाहिजे आणि तुमचाच निर्णय महत्त्वाचा आहे. या नुकसानीची जबाबदारी मी घेतो. या निकालानंतर मी पक्षाचे नेतेपद सोडत आहे”, असं ऋषी सुनक म्हणाले.
ऋषी सुनक म्हणाले की, माझ्या हातात सत्ता आल्यानंतर मी आर्थिक सुधारणांवर भर दिला, देशाचा आर्थिक दृष्टीकोन या पक्षासाठी महत्त्वाचा होता. जेव्हा मी पहिल्यांदा येथे तुमचा पंतप्रधान म्हणून उभा राहिलो, तेव्हा मी तुम्हाला सांगितले होते की माझ्याकडे असलेले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे आमच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता आणणे. महागाई पुन्हा वाढली आली आहे, तारण दर घसरले आहेत.”
“परंतु, माझा विश्वास आहे की हा देश २० महिन्यांपूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि मजबूत आहे. तसंच २०१० च्या तुलनेत अधिक समृद्ध, सुंदर आणि लवचिक आहे”, असंही सुनक यांनी शुक्रवारी सांगितलं.