साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यासाठी लोकांचं प्राधान्य असतं. हीच वेळ साधत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘पेटीएम’ने खास ऑफर सुरु केली आहे. ई-वॉलेटमधली अग्रगण्य कंपनीनं असलेल्या पेटीएमनं पेटीएम गोल्ड सर्व्हिस सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला अवघ्या 1 रुपयात 24 कॅरेट सोनं खरेदी करता येणं शक्य आहे.
पेटीएमवर 1 रुपया ते 1.50 लाख रुपयापर्यंत सोनं खरेदी करु शकता. पेटीएमवर सोनं खरेदी करण्यासाठी पैशांमध्ये आणि ग्राममध्ये असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी पैशांमध्ये खरेदी करण्याचा पर्याय निवडून तुम्ही त्याठिकाणी किमान एक रुपयात (0.0003 ग्राम) सोनं खरेदी करु शकतात. तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं 24 कॅरेटचं असून ते लॉकरमध्ये ठेवलं जाईल आणि हवं तेव्हा तुम्ही ते घरी घेऊन जावू शकता, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. सोन्याची खरेदी केल्यानंतर तुमचं सोनं MATC–PMP या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जाईल. खरेदी केलेलं सोनं त्याचठिकाणी तुम्ही लगेच विकू देखील शकता.
किमान 1 ग्रॅम सोनं खरेदी केल्यास ते घरी सुरक्षित पोहोचवलं जाईल. यामध्ये 1, 2, 5, 10 आणि 20 ग्रॅम सोन्याची नाणी आहेत. याशिवाय तुम्हाला कॅशबॅक आणि डिजीटल सोनं खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला जातो. पेटीएम व्यतिरिक्त Bullion India च्या माध्यमातून देखील तुम्ही सोनं खरेदी करु शकाल. मात्र त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 300 रुपयांचं सोनं खरेदी करावं लागेल. हे सोनं देखील MATC–PMP लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जाईल आणि घरी सुरक्षित पोहचवण्याची देखील सोय केली जाईन.