Alakh Pandey won peoples hearts: विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे नातं सगळ्यात खास आहे असं म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांचे कौतुक ते तक्रार पर्यंत सगळ्याच गोष्टी पालकांकडून शिक्षकांपर्यंत पोहचवल्या जातात. मग नंतर विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात चांगले गुण मिळावे ते अगदी कोणत्या गोष्टी करण्यात त्याला जास्त आवड आहे हे शिक्षकाच्या निरीक्षणातून ठरवले जाते. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रेमाचे, आदराचे, आपुलकीचे नाते तयार होते . तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; यामध्ये शिक्षणविश्वातील प्रसिद्ध शिक्षक फिजिक्स वाला विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आईशी प्रेमळ संवाद साधताना दिसला आहे.
टेक कंपनीचे संस्थापक अलख पांडे आयआयटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या घरी गेले आहेत. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या आईने अलख पांडे यांच्यासाठी खास पुरी-भाजी बनवली होती. घरात बेडवर बसून अलख पांडे विद्यार्थ्यांबरोबर पुरी-भाजी खाताना व आईशी संवाद साधताना दिसत आहेत. आयआयटीची तयारी करताना विद्यार्थ्याने कसा अभ्यास केला व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा ऐका.
व्हिडीओ नक्की बघा…
विद्यार्थ्याच्या आईबरोबर अलख पांडे यांनी साधला संवाद:
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, विद्यार्थ्याची आई टेक कंपनीचे संस्थापक अलख पांडे यांच्या समोर मुलाचे कौतुक करत आहे. आई व्हिडीओत म्हणते, ‘अभ्यास करताना माझा मुलगा उशी घेऊन बेडवर तर कधी जमिनीवर बसायचा, मोबाईलचं नेट संपल्यावर शेजारच्यांचा वायफाय कनेक्ट कारण्यासाठी माळ्यावर जायचा. त्याने आयआयटीचा अभ्यास करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे’ हे सर्व बोलणं टेक कंपनीचे संस्थापक अलख पांडे ऐकताना व आईला काही प्रश्न विचारताना सुद्धा दिसत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @physicswallah या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओतील अलख पांडे यांच्या साधेपणाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. काही युजर्सनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केलं आहे. अलख पांडे यांनी फिजिक्स वाला या नावाने स्वतःचे यूट्यूब चॅनेल उघडले आणि आपला प्रवास सुरू केला. युट्युबवर त्यांनी लेक्चर्सचे व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या व्हिडीओची मदत होऊ लागली. यामुळे अलख पांडे आज शिक्षणविश्वातील प्रसिद्ध शिक्षक म्हणून ओळखले जातात.