दारुचे व्यसन शरीरासाठी अत्यंत घातक मानले जाते. त्यामुळे देशात नेहमीच दारुबंदी बाबत आंदोलने केली जातात. परंतु कानपुर मधील एका व्यक्तिने चक्क दारुच्या किंमतीत घट करावी यासाठी आंदोलन केले आहे.
आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचे नाव संजय शर्मा असे आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाने रस्त्यावर फलक लावला आहे. दारुच्या किंमतीत सरकारने प्रचंड वाढ केली आहे. १०० रुपयांची दारुची बाटली आता २५० रुपयांना मिळते. परिणामी घर खर्चाला पैसे कमी पडतात. त्यामुळे नरेंद्र मोदींनी दारुसाठी विशेष अनुदान मिळवून द्यावे. तसेच २५० रुपयांची दारुची बाटली १०० रुपयांना द्यावी व उर्वरीत रक्कम त्याच्या कुटुंबियांच्या खात्यात जमा करावी अशी देखील मागणी या फलकाव्दारे संजय शर्मा याने केली आहे.
संजय शर्मा दररोज दोन बाटल्या दारु पितो. परंतु वाढलेल्या किंमतीमुळे दारु आता त्याच्या आर्थिक क्षमतेबाहेर जात आहे. त्यामुळे त्याने हे आंदोलन केले आहे. दारुवरील अनुदानासाठी केलेल्या या आंदोलनात त्याची पत्नी व आईनेही सहभाग घेतला आहे. जर सरकारने त्याला ही सबसिडी मिळवून दिली तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. असाही दावा या व्यक्तिने केला आहे.