देशभरातील विविध मंदिरांत वेळोवेळी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. त्यात लोकांना प्रसाद म्हणून मोफत भोजन दिले जाते. पण, अशाच प्रकारे एका ठिकाणी आयोजित केलेल्या भंडाऱ्यातील प्रसादाच्या भाजीत चक्क जिवंत साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्य व्यक्त केले आहे.
भंडाऱ्यासाठी बनविलेल्या भाजीच्या बादलीत एक जिवंत साप आढळल्याने तेथील उपस्थित लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती भाजीच्या बादलीतून साप बाहेर काढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओत ती व्यक्ती साप जिवंत नसल्याचे सांगतेय; पण काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला दिसेल की, साप हालचाल करीत असल्याचे स्पष्टपणे दिसतेय. त्यावरून साप जिवंत असल्याचे दिसून येते.
या व्हिडीओत कोणीतरी म्हणत आहे की, हा साप भारतातील तिसरा सर्वांत विषारी साप मानला जातो. ही घटना कुठे घडली याबाबत अन्य कोणतीही माहिती उपलब्ध नाही; पण सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, भंडाऱ्यातील जेवणात आढळलेला हा कॉमन सॅण्ड बोआ आहे आणि तो विषारी नाही. दुसऱ्याने लिहिले की, हा साप रसेल वायपर प्रजातीचा आहे आणि सर्वांत विषारी मानला जातो. आणखी एका युजरने, ज्यांनी ज्यांनी ही भाजी खाल्ली आहे, त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे, असा सल्ला दिला आहे.
सापाचा व्हिडिओ पाहून लोक हैराण
मात्र हा साप कोणत्या प्रजातीचा आहे आणि त्याने कोणाला दंश केले किंवा नाही याबाबत ठोस कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान यापूर्वी २०२३ मध्ये बिहारमधील अररिया जिल्ह्यातील फोर्ब्सगंज येथील सरकारी शाळेत दुपारच्या जेवणादरम्यान असाच काहीसा प्रकार घडला होता. जे अन्न खाऊन अनेक विद्यार्थी आजारी पडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.