प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्याच्या शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व असते. भारतीय संस्कृतीत तर गुरूला देवाचा दर्जा दिला जातो. कारण गुरु हे आपल्या शिष्याला ज्ञानाने परिपूर्ण ठेवण्यात तसेच त्याला भविष्यात योग्य मार्गावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. परंतु आजच्या काळात आपल्या विद्यार्थ्यांसाठी जीवन समर्पित केलेले शिक्षक आणि आपल्या शिक्षकांप्रति आईवडिलांसमान आदर बाळगणारे विद्यार्थी क्वचितच बघायला मिळतात. पण सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात एका शिक्षकाच्या निवृत्तीच्या दिवशी संपूर्ण शाळा त्यांना अगदी भावून होऊन निरोप देत आहेत. या व्हिडीओमध्ये हे विद्यार्थी आपल्या लाडक्या शिक्षकाला मिठी मारून रडताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, सह-शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून या शिक्षकाला शाल आणि फुलांचा हार घालून त्यांचा सन्मान केला. यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या पाया पाडण्यासाठी त्यांच्या भोवती गर्दी केली. जेव्हा हे शिक्षक सगळ्यांचा निरोप घेऊ लागले तेव्हा तिथे उपस्थित असलेले विद्यार्थी आणि इतर शिक्षक आपले अश्रू आवरू शकले नाहीत. ओक्सबोक्शी रडणाऱ्या या मुलांना त्या शिक्षकाने मिठी मारताच विद्यार्थ्यांनी चहुबाजूने शिक्षकास घेरले आणि त्यांना मिठी मारून रडू लागले. शाळेतील सर्वच विद्यार्थी त्यांच्याशी अतिशय जोडलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकाचा निरोप सहन होत नव्हता.
आयएएस अधिकारी अविनाश शरन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. ‘सरकारी शाळेतील शिक्षकाचा निवृत्तीचा दिवस. किती सुंदर क्षण !’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.