मोदी सरकारच्या बहुचर्चित अशा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुख्य सल्लागार म्हणून जपान सरकारने संजीव सिन्हा यांची निवड केली. पण संजीव आणि जपानच एक वेगळंच नातं आहे. सिन्हा हे अनेक वर्षांपासून जपानमध्ये वास्तव्यास आहेत. टाटा अॅसेट मॅनेजमेंट तसेच टाटा रिअल्टी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी जपानमधील मुख्य प्रतिनिधी म्हणून काम केलंय. जपानमधल्या वास्तव्यात त्यांनी तिथल्याच एका महिलेशी लग्न केलं. या जोडप्याला एक लहान मुलगी असून तिचं नाव माया असल्याचं समजतं आहे.
मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या आणि अंदाजे १ लाख कोटी एवढा खर्च असलेल्या या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून काम करणारे सिन्हा एका सामान्य कुटुंबात जन्मले. ते मूळचे राजस्थानमधल्या बाडमेर जिल्हातले. सिन्हा लहानपणापासूनच हुशार होते. दहावीच्या परीक्षेत राज्यातून पहिले तर बारावीच्या परीक्षेत आठवे आले. त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. मुलाला शिकवणीला पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे पैसे नव्हते. जिथे आजकाल जेईई परीक्षेच्या तयारीसाठी पालक मुलांवर लाखो रुपये खर्च करतात, तिथे त्यांनी घरीच अभ्यास करून जेईईत यश संपादन केले.
वाचा : पोलीस दलातील ‘हा’ सिंघम समाजसेवेवर खर्च करतो पगारातील ४० टक्के रक्कम
आयआयटी कानपूरमध्ये त्यांनी आपले शिक्षण घेतले. आयआयटीचा खर्च त्यांच्या वडिलांना परवडणारा नव्हता. त्यामुळे जवळपास आयआयटी शिक्षणापासून ते मुकणारच होते. पण वडिलांनी कर्ज काढून त्यांना शिकवले. कर्जासाठी त्यांच्या वडिलांना खूपच खस्ता खाव्या लागल्या होत्या. कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती, शेवटी एका बँकेने त्यांना कर्ज दिले आणि सिन्हांने आयआयटीमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेले सिन्हा ही बाडमेरमधली पहिलीच व्यक्ती आहे