बँकेचे व्यवहार करताना ग्राहक म्हणून आपले काय अधिकार आहेत हे प्रत्येकाला माहिती असायलाच हवेत. हे व्यवहार करताना ग्राहक म्हणून अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते, अशा अडचणी आल्याच तर ग्राहक म्हणून त्यांचा कसा सामना करावा, त्यासाठी कोणते अधिकार वापरावेत हे जाणून घेणं तितकंच गरजेच आहे. कोणतीही बँक तुम्हाला या अधिकारांपासून वंचित ठेवू शकत नाही. ‘कोड ऑफ बँक्स कमिटमेंट टू कस्टमर्स’मध्ये ग्राहकांच्या या अधिकारांविषयी विस्तृत माहिती दिली आहे. तेव्हा ते जाणून घेतले तर भविष्यात नक्कीच याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल.
– व्यवसायासाठी किंवा अन्य कारणांसाठी अनेकदा आपण बँकेतून कर्ज काढतो. यासाठी बँकेत कर्जासाठी अर्ज करावा लागतो, पण समजा एखाद्या बँकेनं तुमचा अर्ज नाकारला तर तो का नाकारला याचं कारणंही बँकेनं देणं अनिवार्य आहे. जर हे कारण तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.
– जर समजा ग्राहकाला कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी एखाद्या महिन्यात अडचण आली तर याची कल्पना मुदतीच्या अंतिम तारखेपूर्वी तो बँकेला देऊ शकतो. त्यानं दिलेलं कारण योग्य आहे की नाही याची पडताळणी करून झाल्यावर बँक त्या ग्राहकापुढे ‘वन टाइम सेटलमेंट’चा पर्याय ठेवते. यातल्या अटीची पूर्तता केल्यानंतर त्या व्यक्तीला बिल किंवा हप्ता भरण्यासाठी काही दिवसांचा अवधी मिळू शकतो.
– जर तुमच्या जवळ जुनी किंवा फाटलेली नोट असेल तर ती तुम्ही कोणत्याही बँकेतून बदलून घेऊ शकता. नोटा बदलून देण्यासाठी बँक तुम्हाला नकार देऊ शकत नाही.
– एखाद्या ग्राहकाचा चेक ड्रॉपबॉक्स किंवा अन्य सुविधांमधून जमा करून तो वठवण्यास बँकेकडून उशीर झाला असेल, तर यासाठी ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी लागू शकते. बॅंकेने स्वतःहून यासंदर्भात कार्यवाही करणे अपेक्षित असते.
– जर तुम्ही बँकेमध्ये २० लाख किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या कर्जासाठी अर्ज करत असाल तर त्या अर्जाचं पुढे काय झालं याचं उत्तर ३० दिवसांच्या आत बँकेतून त्या ग्राहकाला येणं अपेक्षित असतं.