मगरीला अगदी दुरून जरी पाहिलं तरी मनात धडकी भरते. मग मगरीच्या जवळ जाऊन तिच्यासमोर उभं राहणं ही तर खूपच दूरची गोष्ट झाली. कल्पना करा की, तुम्ही एखाद्या नदीवर मासे पकडण्यासाठी उभे आहात आणि जाळं टाकून मासे पकडत आहात. पण अचानक समोर मगर आली तर? विश्वास बसणार नाही ना, पण असं खरच घडलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अमेरिकेतल्या फ्लोरिडामधला आहे. प्रत्येकवेळी मासेमारी करताना सुखद अनुभव येईलंच असं नाही, अनेकदा ही मासेमारी भयावहसुद्धा ठरू शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ पाहून मच्छिमारालाच नाही तर तुम्हालाही घाम फुटेल. नदीच्या पाण्यातील छोट्या मोठ्या किडे-माशांपासून ते माणसांपर्यंत सगळेच जण मगरीला घाबरतात. नेहमी शिकार करण्याच्या प्रयत्नात असलेली मगर अचानक समोर आलेली पाहून सर्वांचाच थरकाप उडाला.
या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा फ्लोरिडामधल्या पाम कोस्ट नदीजवळ मासे पकडताना दिसून येतोय. त्याचे वडील सुद्धा मासे पकडण्यासाठी त्याला प्रोत्साहित करताना दिसून येत आहेत. पण तिथे मगरही असेल याची कल्पना सुद्धा त्यांना आली नव्हती. मुलगा नदीत मासे पकडतोय आणि त्याचे वडील मुलाचा व्हिडीओ बनवत आहेत. मासे पकडत असताना एक मासा या लहान मुलाने टाकलेल्या काट्यात अडकलेला दिसून येतोय. मासा सापडल्याच्या आनंदात हा लहान मुलगा स्पुल रिल गुंडाळताना दिसून येतोय. काट्यात अडकलेल्या माशाचं फक्त तोंड वर आणताच नदीतून अचानक एक मगर बाहेर आली. हे पाहून त्या लहान मुलाची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मगरीला पाहताच मुलगा घाबरून मागे हटतो आणि त्याच्या हातातलं स्पुल रिल सोडून देतो.
नदीच्या बाहेर आलेली मगर लहान मुलाने पडकलेला मासा एका झटक्यात घेऊन निघून जाते. माशाची शिकार करण्यासाठी आलेल्या मगरीने मुलाच्या हातातलं स्पुल रिल घेऊन गेलेली दिसून येतेय. मगरीची धडकी भरवणारी ही एन्ट्री पाहून तिथे असलेल्या मुलाचे वडील सुद्धा हैराण होत ‘ओह्ह माय गॉड’ असा उच्चार करताना दिसून येत आहेत. बाप लेकाचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांना काही झालं नाही. त्यांना वेळीच मगर दिसली आणि ते सावध झाले. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
हा व्हिडीओ सीन मॅकमोहन यांनी त्यांच्या फेसबूक अकाउंटवर शेअर केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. नेटिझन्सनी सुद्धा सीन मॅकमोहनच्या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या या लहान मुलाला तलावाजवळ उभं राहण्याची परवानगी दिल्याबद्दल अनेक युजर्सनी तर सीन यांना धारेवर धरलं: “फ्लोरिडामध्ये जिथे पाणी आहे, मगरींचा वावर असतो, अशा ठिकाणी मासेमारी करताना सावध रहा.” असं आवाहन देखील अनेक युजर्स करत आहेत.