Mumbai’s Iconic Kaali-Peeli Padmini Taxis To Go Off Roads : मुंबईत पूर्वी ओला, उबर यांसारख्या कॅब सेवा नव्हत्या. त्यावेळी काळ्या-पिवळ्या टॅक्सीने मुंबईकरांना प्रवासात खूप साथ दिली. त्यामुळे अनेक दशकांपासून ही काळी-पिवळी टॅक्सी सर्वसामान्यांसाठी वाहतुकीचे सोईचे साधन म्हणून ओळखली जात होती. विशेषत: रंगामुळे ती शहरात खूप प्रसिद्ध झाली. त्यामुळे मुंबईचा जेव्हा विचार येतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात शहरातील प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचे चित्र उभे राहते. अनेक मुंबईकरांचे या टॅक्सीचे अनोखे नाते आहे. अनेक मुंबईकरांच्या या काळ्या-पिवळ्या टॅक्सीबरोबर एक तरी एक गोड आठवण नक्कीच जोडलेली असेल. मात्र, मुंबईच्या रस्त्यावर ६० वर्षांपासून धावणाऱ्या या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा प्रवास कायमचा बंद होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांनी काळ्या-पिवळ्या टॅक्सीबाबत विविध मिम्स, पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत. त्यात देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी सेवेबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचा एक फोटो शेअर करीत तिच्या आठवणी व्यक्त करीत एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे.
अलविदा, गुड बाय…; आनंद महिंद्रांची ट्विटर पोस्ट
आनंद महिंद्रा यांनी याबाबत लिहिलेय की, आजपासून आयकॉनिक प्रीमियर पद्मिनी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरून धावणार नाही. ही टॅक्सी खूप जुनी, आरामदायी नसलेली, अविश्वसनीय, आणि खूप आवाज करणारी होती. टॅक्सीमध्ये सामान ठेवायलाही जागा नव्हती; पण माझ्या वयाच्या लोकांच्या या टॅक्सीबरोबर अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. आम्हाला पॉइंट ए ते पॉइंट बीपर्यंत नेण्याचं काम या टॅक्सीनं केलं. गुड बाय आणि अलविदा, काळी-पिवळी टॅक्सी! चांगल्या दिवसांत मला साथ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!
काळ्या-पिवळ्या टॅक्सीबाबत आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर अनेक युजर्स कमेंट्स करीत आपल्या आठवणी शेअर करीत आहेत.
नवीन मॉडेल आणि कॅब सेवांनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा मुंबईच्या रस्त्यावरील प्रवास इतिहासजमा झाला आहे. अलीकडेच सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या प्रसिद्ध लाल डबल डेकर डिझेल बसेस बंद करण्यात आल्या. त्यानंतर ही टॅक्सीही आता दिसणार नाही. त्यावर आता काहींनी किमान एक ‘प्रीमियर पद्मिनी’ रस्त्यावर किंवा संग्रहालयात जतन करावी, अशी मागणी केली आहे.