विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे अनेकांनाच फायदा झाला. दर दिवशी प्रगती होत गेली आणि विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याच्या, त्या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेण्याचे मार्ग खुले झाले. या साऱ्यामध्ये इस्रायल या देशाचा मोलाचा वाटा आहे. सध्या भारत दौऱ्यावर असणाऱ्या इस्रायलच्या पंतप्रधानांच्या म्हणजेच, बिन्यामीन नेतान्याहू यांच्याविषयी आणि त्यांच्या भारत दौऱ्याविषयी प्रत्येकाला कुतूहल लागले आहे. नेतान्याहू यांच्या राष्ट्राचा भारताशी असणारा सलोखा पाहता या दोन्ही देशांचे संबंध असेच राहोत अशीच अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. आधुनिकीकरण आणि काही संशोधनांच्या बाबतीत भारतातील मिझोरमच्या आकाराचा असणारा हा देश बराच पुढे आहे.
साधारण मुंबईपेक्षाही कमी लोकसंख्या असणाऱ्या या देशानेस तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असे काही योगदान दिले की, त्याविषयी जाणताच अनेकांना धक्का बसला. इस्रायलने लावलेल्या अशाच काही संशोधनांवर ‘इंडिया टाइम्स’ने नजर टाकली असता खालील गोष्टींचा उलगडा झाला.
१. यूएसबी फ्लॅश ड्राइव्ह-
यूएसबी फ्लॅश ड्राइव्हचा शोध लावल्आच्या मुद्द्यावरुन तील कंपनींमध्ये वाद आहे. पण, सुरुवातीच्या काळात वारपण्यात आलेल्या फ्लॅश स्टोरेजच्या सॅम्पल्सचे श्रेय ‘एम सिस्टीम’ M-Systems या इस्रायली कंपनीला जाते. (डिसेंबर २००० मध्ये आयबीएमच्या साथीने त्यांनी हे सॅम्पल बनवले होते.)
२. इंटेल ८०८८ मायक्रोप्रोसेसर-
पर्सनल कॉम्प्युटर्सच्या दुनियेत पुढील प्रगती झालीच नसती जर, इंटेल ८०८८ मायक्रोप्रोसेसर असणारे आयबीएमचे पर्सनल कॉम्प्युटर नसते. संगणकांच्या या विश्वात क्रांती घडवण्याऱ्या या कॉम्पुटरची निर्मिती इंटेलच्या ‘हायफा लॅब’ने Haifa lab केली होती.
३. वीओआयपी (वॉईस ओव्हर आयपी)-
स्काईपचा वापर कसा केला जातो, हे जर तुम्हाला ठाऊक असेल तर, इंटरनेटचा वापर करत जगातील कोणत्याही कोपऱ्यातील दुरध्वनीवर संपर्क साधण्याची कार्यप्रणालीसुद्धा तुम्हाला ठाऊक असेल. एका कॉम्प्युटर टर्मिनल वरुन संदेश (किंवा आवाज) जगातील कोणत्याही दुरध्वनीपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अनपेक्षित असे संशोधन करण्यात आले. ज्याला कालांतराने वॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (वीओआयपी) या नावाने ओळखले जाऊ लागले. ‘वोकल टेक’ VocalTec या इस्रायली कंपनीने हे संशोधन केले होते.
४. आरएसए पब्लिक की एन्क्रीप्शन-
डिजिटल कम्युनिकेशन विश्वात सुरक्षितेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आणि सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या एन्क्रीप्शनचे श्रेय इस्रायली क्रिप्टोग्राफर, अदी शामिर cryptographer, Adi Shamir याला जाते.
५. आयसीक्यू-
सध्याच्या घडीला मोबाईल चॅटसाठी वारपरल्या जाणाऱ्या अॅपच्या यादीत व्हॉट्स अॅप अग्रस्थानी आहे. पण, इंटरनेटच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्येच आयसीक्यूच्याच चर्चा होत्या. ऑनलाईन इंस्टंट मेसेंजरच्या यादीत त्यावेळी आयसीक्यू हे एकमेव नाव चर्चेत होते. १९९६ मध्ये ‘मिराबीलिस’ Mirabilis या इस्रायली कंपनीने आयसीक्यू तयार केला होता. त्यामुळे ICQ ला ‘एआयएम’, ‘याहू मेसेंजर’ आणि ‘गुगल टॉक’ यांची ब्लू प्रिंटही म्हटलं जातं.
६. मोबाईल आय-
आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या या विश्वात इस्रायलने लावलेला आणखी एक शोध म्हणजे मोबाईल आय. इंटेलिजन्ट अल्गोरिदम असणारा अतिसूक्ष्म कॅमेरा म्हणजेच या मोबाईल आयच्या मदतीने एखाद्या वाहन चालकाला ते वाहन चालवणे फारच सोयीचे झाले. कारच्या स्टिरिंगसोबत मोबाईल आय लिंक केलेले असायचे. जेणेकरुन समोरुन येणाऱ्या पादचाऱ्यांचा अंदाज येऊन संभाव्य अपघात टाळण्यास त्याची मदत झाली. ही कार्यप्रणाली ‘बीएमडब्ल्यू’ आणि ‘वोल्वो’ कारमध्ये उपयोगात आणण्यात आली.
७. एन्डोस्कोपमधील सर्वाच लहान कॅमेरा-
०.९९ एमएम आकाराचा जगातील सर्वात लहान व्हिडिओ कॅमेरा इस्रायलच्या ‘मेडिगस’ Medigus नामक कंपनीने तयार केला होता. वैद्यकिय क्षेत्रात अतिशय महत्त्वाच्या अशा एन्डोस्कोपमध्ये या कॅमेऱ्याचा वापर केला जातो.
८. फेस अँड आय ट्रॅकिंग टेक्नॉलॉजी-
इस्रायलमधील ‘उमूवे’ Umoove या कंपनीने चेहरा आणि डोळे ट्रॅक करणारे सॉफ्टवेअर तयार केले होते. पुढे काही स्मार्टफोनमध्येही त्याचा वापर करण्यात आला. या काही अफलातून आणि अविश्वसनीय संशोधनांच्या यादीत जगातील पहिला ‘डीएनए’ कार्यप्रणालीवर चालणारा संगणक, ‘वायबर अॅप’ या गोष्टींचा शोध लावण्याचे श्रेयही इस्रायललाच जाते. तेव्हा जगाच्या नकाशात अगदी लहान आकारात दिसणाऱ्या या देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विश्वात मोलाचे योगदान दिले आहे असे म्हणायला हरकत नाही.