जगातली सर्वात श्रीमंत दोन व्यक्ती कोणत्या याचं उत्तर गेल्या दशकभराहून जास्त काळ एकच होतं. सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे बिल गेटस् आणि दुसऱ्या क्रमांकावर गुंतवणूकदारांसाठी गुरूस्थानी असणारे वाॅरन बफे.

पण आता ‘अॅमेझाॅन’च्या जेफ बेझोस यांनी वाॅरन बफे यांना मागे टाकत सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱं स्थान पटकावलं आहे. पश्चिम आशियामधली ‘सौक’ (souq) ही ई-काॅमर्स कंपनी अॅमेझाॅनने विकत घेतल्यावर जेफ बेझोस यांच्या संपत्तीत वाढ होत त्यांनी वाॅरन बफे यांच्याकडून त्यांचं स्थान हिरावून घेतलं. आता ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स’नुसार जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत जेफ बेझोस यांनी दुसरं स्थान पटकावलं आहे.

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी दरवर्षी फोर्ब्ज् या मॅगझीनकडून प्रसिध्द केली जाते. या वर्षी प्रसिध्द झालेल्या यादीत वाॅरन बफे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. पण ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार बेझोस आता या स्थानावर आहेत. ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स’ची यादी ‘फोर्ब्ज’ मॅगझीनमध्ये प्रसिध्द झालेल्या यादीच्या जवळ जाणारी मानली जाते.

ई-काॅमर्स वेबसाईट्समध्ये जगात आणि आता भारतातही आघाडीवर असणाऱ्या ‘अॅमेझाॅन’चे जेफ बेझोस हे मालक आहेत. त्यांची संपत्ती आता ७६ अब्ज डाॅलर्स झाली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या बिल गेट्स यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती १० अब्ज डाॅलर्सनी कमी आहे. तर वाॅरन बफे यांच्यापेक्षा ते ७० कोटी डाॅलर्सने आघाडीवर आहेत. अॅमेझाॅन व्यतिरिक्त ‘ब्लू ओरिजिन्स’ ही कंपनीसुध्दा जेफ बेझोस यांच्या मालकीची आहे. अंतराळप्रवासाच्या क्षेत्रात ही कंपनी संशोधन करते.

कोणाकडे किती संपत्ती आहे याचे आकडे सारखे बदलत असतात. त्यामुळे सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतली स्थानं वरखाली होत असतात. उद्या वाॅरन बफे आपलं दुसरं स्थान पुन्हा पटकावतीलही. पण गेली दोन दशकं या स्थानावर मजबूत पकड ठेवणाऱ्या वाॅरन बफेंना पहिलाच धक्का मिळाल्याने ही बातमी सगळीकडे चर्चेला विषय ठरली आहे.

Story img Loader