एखाद्या व्यक्तीला लग्नाची मागणी घालण्यासाठी, तो दिवस खास बनवण्यासाठी प्रत्येकाला आपआपल्या पद्धतीने काहीतरी विशेष, काहीतरी आगळंवेगळं करायचे असते. असाच काहीसा विचार अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्या प्रियसीला लग्नाची मागणी घालण्यासाठी केला असल्याचे, एका व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या व्यक्तीने, चक्क पोलिसांच्या मदतीने ट्राफिक सिग्नलवर आपल्या प्रियसीला लग्नासाठी मागणी घातली आहे.
ईएयु क्लेअर पोलीस विभागाने [Eau Claire Police Department] हा जवळपास तीन मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर “ट्राफिक सिग्नलवर केव्हा काय घडेल, काही सांगता येत नाही.” अशा कॅप्शनसह शेअर केला आहे.
या व्हिडीओची सुरवातीला एक पोलीस अधिकारी, त्या व्यक्तीची गाडी थांबवून त्याला बाहेर येण्यास सांगतात. त्यानंतर काही वेळाने त्याच्या प्रेयसीलादेखील गाडीच्या बाहेर येण्याची विनंती दुसरा पोलीस अधिकारी करतो. प्रेयसी दुसऱ्या पोलिसासोबत बोलत असताना, पहिल्या पोलीस अधिकाऱ्याने प्रियकराला अटक केल्याचे नाटक केले. हा सर्व काय गोंधळ सुरु आहे हे विचारण्यासाठी प्रेयसी पहिल्या पोलीस अधिकाऱ्याकडे बघते. तेव्हा, त्या गोंधळलेल्या प्रेयसीला तिच्या प्रियकराने एका गुडघ्यावर बसून, हातात अंगठी घेऊन तिला लग्नाची मागणी घातली. हा सर्व प्रकार लक्षात येताच, तिने हसत हसत त्याला होकार दिला. यानंतर त्या दोघांनी त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचे, नाटकात सहभागी होऊन त्यांचा हा दिवस खास बनवून देण्यासाठी खूप आभार मानले.
हेही वाचा : Video : झेंडूच्या फुलांपासून बनवले आईस्क्रीम; काय आहे रेसिपी आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा.
हा व्हिडीओ फेसबुक या सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हायरल व्हिडीओला जवळपास तेहेत्तीस हजार व्ह्यूज आणि भरपूर लाईक्सदेखील मिळाले आहेत. त्याचसोबत यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील काही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते पाहा.
[व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा]
व्हिडिओमध्ये असलेल्या प्रियकराने म्हणजेच, ट्रॉय गोल्डश्मिटने [Troy Goldschmidt], “हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल ईसीपीडी [ECPD] चे खूप खूप आभार. मी त्या क्षणी नेमकं काय बोललो हे मला अजिबात आठवत नाहीये पण तुम्ही हा व्हिडीओ शेअर केल्यामुळे मी आणि मोरिया [Moriah] आम्हाला प्रचंड आनंद झाला आहे.” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, “या जोडप्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी ईसीपीडीचे खूप कौतुक.” अशी कमेंट केली. तिसऱ्याने, ” किती गोड… ती बाई हे सर्व घडत असताना किती शांत होती.. फारच छान. दोघांचे खूप अभिनंदन.” अशी प्रतिक्रिया दिली. “पोलिस या नाटकात अगदी छान सहभाग घेतला आहे.” असे चौथ्याने म्हंटले, तर शेवटी पाचव्याने “फारच भन्नाट पद्धतीने मागणी घातली आहे.” अशी प्रतिक्रिया केल्याचे आपल्याला पाहायला मिळते.