Suitcase Found After Four Years Viral News : विमानातून प्रवास करताना प्रवाशांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावच लागतं, याशिवाय त्यांच्याजवळ असलेल्या सामनाचीही विशेष काळजी प्रवाशांना घ्यावी लागते. कारण विमानतळावरील सुरक्षा रक्षक तुमच्याकडे असलेल्या सर्व सामानाची कसून तपासणी करत असतात. अशा परिस्थितीत जर तुमची सुटकेसच विमानतळावर हरवली, तर पायाखालची जमिनच सरकल्यासारखं तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अमेरिेकेच्या एका महिलेसोबत असंच काहीसं घडलं. एप्रिल गावीन असं या महिलेचं नाव आहे. २०१८ मध्ये युनायटेड एअरलाईन्सने या महिलेनं शिकागोला एका बिझनेस ट्रीपसाठी प्रवास केला होता. मात्र, परतीच्या प्रवासाला निघाल्यावर एअरलाईन्सकडून तिची सूटकेस हरवली होती. पण, चार वर्षांनंतर मध्य अमेरिकेच्या होंडूरासमध्ये ही सुटकेस सापडली. एप्रिलला एक फोन कॉल आल्यानंतर सुटकेस सापडली असल्याची माहिती देण्यात आली.
Tiktok मुळे ४ वर्षांनंतर सापडली महिलेची सुटकेस
सुटकेस हरवल्यानंतर चार वर्षांच्या कालावधीचं रहस्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. २०१८ मध्ये एअरलाईन्सकडून सुटकेस हरवल्याची माहिती एप्रिल गावीनने टिकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणली. सुटकेस शोधण्यासाठी अनेक महिने प्रयत्न केल्याचा दावाही गावीनने केला होता. सुटकेस नेमकी कुठं आहे, याबाबत ठामपणे सांगता येणार नाही, असं एअरलाईन्सकडून सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. त्यानंतर एअरलाईन्सकडून त्या महिलेला सुटकेसचा मोबदलाही देण्यात आला. परंतु, या आठवड्यात एप्रिल गावीन या महिलेला एक फोनकॉल आला. ह्यूस्टन, टेक्सास आणि त्यानंतर होंडुरासपर्यंत या सुटकेसचा प्रवास झाल्याचं या महिलेला फोनवरून सांगण्यात आलं. सुटकेसमधील सामान सुरक्षित असल्याचंही एप्रिलला सांगण्यात आलं. न्यूयॉर्क पोस्टने याबाबतची माहिती समोर आणली असून इंटरनेटवर महिलेची रंजक कहाणी तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
” ह्यूस्टन, टेक्सासमधून मला एक फोनकॉल आला. माझी सुटकेस सापडली असल्याचं मला सांगण्यात आलं. त्यावेळी मी खूप गोंधळेली होती. एअरलाईनला वाटलं त्यांच्याकडून टायपो मिस्टेक झाली आहे. कारण सुटकेस चार वर्षांपूर्वी हरवलेली होती. होंडुरासमध्ये सुटकेस होती, त्यानंतर ती ह्यूस्टनमध्ये कशी गेली, याबद्दल कुणालाही माहित नव्हतं.” अशाप्रकारे सुटकेसची रंजक कहाणी एप्रिलने टिकटॉकच्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणली. २०१८ ला हरवलेली सुटकेस चार वर्षांनंतर सापडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एप्रिलच्या सुटकेसची कहाणी अनेकांना थक्क केल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र तितकचं खरं.