मंगळवारी देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलंय. राष्ट्रवादीच्या खासदार आणि अजित पवार यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आता या प्रकरणावरुन राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपाला लक्ष्य केलंय.
नक्की वाचा >> अजित पवार भाषण प्रकरण : टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण…”
प्रकरण काय?
देहूमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमात त्यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला. अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही.
नक्की वाचा >> अजित पवारांना भाषण करु न दिल्याबद्दल बोलताना भुजबळांकडून पंतप्रधानांचं कौतुक; म्हणाले, “तो मोदींचा मोठेपणा पण…”
सुत्रसंचालकाने थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेतल्यानंतर त्यांनी अजित पवारांकडे हात करत तुम्ही बोला असं सांगितलं. मात्र अजित पवार यांनी आपण बोलावं अशी भूमिका घेत मोदींकडे पाहून भाषणासाठीच्या पोडियमकडे हात केला. याच क्षणाचा फोटो पोस्ट करत अमोल मिटकरींनी भाजपावर टीका केलीय. ‘सही पकडे है…’ या कॅप्शनसहीत मिटकरींनी देहूमधील कार्यक्रमातील हा फोटो शेअर केलाय. या फोटोवर “बाकी अजित पवारांचं भाषणासाठी नाव दिलं नाही हा तुमचा नीचपणा होता. पण मोदींनी सांगून पण त्यांनी भाषण केलं नाही हा महाराष्ट्राचा स्वाभिमान होता,” असा मजकूर लिहिलेला आहे.
नक्की वाचा >> पंतप्रधान मोदींसमोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींना दिली ‘एक्स्चेंज ऑफर’; म्हणाले, “फार मोठं आणि…”
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली नसली तर रोहित पवार, छगन भुजबळ, आशिष शेलार, यशोमती ठाकूर, अमोल मिटकरी यांनी या प्रकरणावरुन भाष्य केल्याचं पहायला मिळालं आहे. या प्रकरणासंदर्भात मतप्रदर्शन करणाऱ्यांमध्ये आता निलेश राणेंच्या नावाची भर पडलीय.