शक्तीरूपातील देवीचे पूजन आणि सृजनाचा सोहळा असलेल्या नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये आज घटस्थापना करून नवरात्रोत्सवाच्या मंगल सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवीची पूजा अर्चना यासोबतच गरबा आणि दांडियाची धूम पाहायला मिळते. अशात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांचा दांडिया आणि गरब्याच्या तालावर ठेका धरणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमरावती येथील रचना नारी मंचाने नवरात्रीच्या निमित्ताने दांडीया प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी महिलांसोबत दांडीया आणि गरबावर ठेका धरला. राणा यांनी हजेरी लावल्यामुळे तेथील महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
नवनीत राणा या एक सिनेअभिनेत्री असून त्यांनी आतापर्यंत तेलुगू, कन्नड़ आणि मलयालम चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयापासून ब्रेक घेतल्यानंतर नवनीत राणा राजकारणात सक्रिय झाल्या. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणा यांनी अमरावतीमधून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचा पराभव केला होता. राणा यांच्या दांडिया नृत्याचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अतिशय सराईताप्रमाणे त्या हे नृत्य करताना दिसत आहेत.