विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस भाऊबीजेनिमित्त पोस्ट केलेल्या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे सांगत आपण पुन्हा नवीन कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येऊ असं म्हटलं आहे. अमृता यांनी स्त्रियांना समर्पित केलेल्या या गाण्यामध्ये  दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचं महत्व पटवून दिलं आहे. मात्र एकीकडे अमृता यांनी या गाण्याला पसंती मिळत असल्याचं म्हटलेलं असतानाच या गाण्याची निर्मिती करणाऱ्या टी-सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर या गाण्याला लाईकपेक्षा डिस्लाइक जास्त आहेत.

नक्की वाचा >> मी पुन्हा येईन, नवीन गाणं घेऊन; अमृता फडणवीसांचे ट्विट

टी- सिरीज मराठी या युट्यूब अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्याला मागील पाच दिवसांमध्ये १८ हजारांहून अधिक डिस्लाइक मिळाले आहेत. तर या गाण्याला लाईक करणाऱ्यांची संख्या एक हजार ९०० असल्याचे या चॅनेलवरील व्हिडीओखालील लाईक,डिस्लाइकच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहेत. मात्र त्याचवेळी हे गाणं सहाव्या क्रमांकाला ट्रेण्ड होत असल्याचे बुधवारी दिसून आलं.


याचबरोबर या व्हिडीओवर तीन हजारहून अधिक कमेंट आल्या असून अनेकांनी गाण्याच्या माध्यमातून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला असला तरी अन्य एखादी गायिका असती तर गाणं आणखीन प्रभावशाली वाटलं असतं अशापद्धतीची मतं नोंदवल्याचे पहायला मिळत आहे.


अमृता यांनी भाऊबीजेच्या दिवशी या गाण्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता. “आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे.. तिला शिकू द्या. जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या. समाज भक्कम करायचा असेल तर तिला आधी सक्षम होऊ द्या. दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत तिला जगू द्या” असं म्हणत त्यांनी त्यांचं नव्या गाण्याचा छोटा व्हिडीओ आणि मूळ गाण्याची युट्यूब लिंक ट्विट केली होती.

त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच मंगळवारीच अमृता यांनी ट्विटवरुन या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाल्याचं सांगत प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानले होते. “महिलांवर आधारित तिला जगू द्या या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांमध्ये या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन लवकरच मी पुन्हा येईन,” असं अमृता यांनी ट्विट केलं होतं.

Story img Loader