सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या अंतरात असणारी दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार या परिसरात असलेल्या हॉटेल्स किंवा बारमध्ये दारूची विक्री करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे एकीकडे स्वागत होत आहे तर दुसरीकडे दारूविक्रेते मात्र कमालीचे नाराज झाले आहेत. अशा वेळी अमुलचे व्यवस्थापकिय संस्थापक आर एस सोदी यांनी १६,००० बारमालक आणि दारूविक्रेत्यांसमोर मिल्क बार सुरू करण्याची कल्पना ठेवली आहे.
वाचा : महामार्गावरील दारुबंदीसाठी लढणाऱ्या लढवय्याची कहाणी
रोजगारनिर्मिती आणि आरोग्यदायी देश निर्माण करण्याचा अमुलचा हा प्रयत्न आहे. अमुलच्या या मिल्क बार संकल्पनेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासारखे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावर ५०० मीटरच्या अंतरात असणारी दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला. दारू पिऊन वाहन चालविण्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. जगाचा विचार करता रस्ते अपघातात भारतात सर्वाधिक बळी जातात. या निर्णयामुळे मोठ्या संख्येने दारूची दुकाने बंद होतील पण व्यवसायावरही याचा मोठा परिणाम होईल अशी प्रतिक्रिया युनायटेड बेवरेजचे कार्यकारी संचालक शेखर राममूर्ती यांनी दिली होती. या निर्णयामुळे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे पण अनेक जण बेरोजगार होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. भारतामध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक आहे. गेल्याचवर्षी महामार्गावर ४ हजारांहून अधिक अपघात झाले होते. यात ४२२९ जण जखमी झाले होते तर १८०२ लोकांचा मृत्यू झाला होता. महामार्गावरील दारूची दुकाने बंद झाल्यामुळे याला कुठेतरी आळा बसेल अशी अपेक्षा आहे.