जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. आत्मघातकी हल्लेखोराकडून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट उसळली होती. जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाकडून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये बॉलिवूडचे कलाकार, राजकीय नेते, खेळाडू, उद्योगपती अशा सर्वांचा समावेश आहे.

अमूल या नामांकित कंपनीकडूनही शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामध्ये अमूलचा आयकॉन असलेल्या कार्टूनच्या हातात पेटलेली मेणबत्ती आहे. तर त्यापुढे कर चले हम फिदा जान ओ तन साथियो… अब हमारे हवाले वतन साथियो… अशा ओळी लिहील्या आहेत. या ओळींमध्ये काहीसा बदल करण्यात आला असून हे मूळ गाणे १९६४ च्या हकीकत या चित्रपटातील आहे. ते महम्मद रफी यांनी गायलेले आहे. इंटरनेटवर अमूलच्या या पोस्टमुळे नेटीझन्सही भावूक झाल्याचे चित्र आहे. अमूलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो अपलोड करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

१४ फेब्रुवारी रोजी तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए महम्मदच्या दहशतवाद्याने पुलवामा जिल्ह्यात चढवलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे. सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यात एकूण ७८ बस होत्या, त्यात २५४७ जवान होते. २० वर्षाचा आदिल अहमद दर हा आत्मघातकी दहशतवादी सहभागी होता.

Story img Loader