Delhi AC Fall Down Video: कोणाचा मृत्यू कधी होईल, कोणाला मृत्यूचा सांगावा येईल हे काही सांगता येत नाही. एखाद्या चालत्या-फिरत्या चांगल्या व्यक्तीचा असा काही शेवट होतो, की ज्याची कधी आपण कल्पनाही केलेली नसते. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. दिल्लीत निष्काळजीपणामुळे अपघातात लोकांचा जीव गमवण्याचा सिलसिला थांबत नाहीये. आता देशाच्या राजधानीतून अशी बातमी आली आहे, जी ऐकून सर्वच हादरले आहेत. दिल्लीतील या धक्कादायक अपघातात एका १८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
दिल्लीतील डीबीजी रोड परिसरात धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सीसीटीव्हीमध्ये समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सोसायटीबाहेरील आवारात एक तरुण स्कूटरवर बसलेला दिसत आहे. दिल्लीत शनिवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडलेली घटना असल्याची माहिती आहे. थोड्याच वेळात त्याचा मित्र त्याच्याजवळ येतो आणि दोघे गप्पा मारताना दिसत आहेत. तितक्यात अचानक दुसऱ्या मजल्यावरून एसीचा भाग खाली कोसळला आणि तो स्कूटरवर बसलेल्या मुलाच्या डोक्यावर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, तरुण स्कूटरवरून खाली कोसळला. अचानक काय घडलं याचा अंदाज आसपासच्या लोकांना येत नाही; पण ते जमिनीवर पडलेल्या तरुणाच्या दिशेनं धावतात. एसीचं आऊटडोर युनिट ज्याच्यावर कोसळलं, त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
(हे ही वाचा : मुंबई लोकलच्या ‘तिच्या’ पहिल्याच प्रवासात काय घडलं? विदेशी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल )
शनिवारी दिल्लीतील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एअर कंडिशनरचे (एसी) बाहेरचे युनिट पडल्याने एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आणि त्याचा मित्र जखमी झाला, असे पोलिसांनी सांगितले. दोरीवाला परिसरात राहणारा जितेश आणि पटेल नगर येथील रहिवासी असलेला त्याचा १७ वर्षीय मित्र प्रांशू हे घटनेच्या वेळी एका इमारतीखाली उभे असताना एकमेकांशी बोलत होते.
येथे पाहा व्हिडीओ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी प्रांशु (१७) वर सध्या उपचार सुरू असून, तो जबाब देण्याच्या स्थितीत नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये जितेश डोरीवालन भागात स्कूटरवर बसून प्रांशुशी बोलत असल्याचे दिसत आहे. दोघांनी मिठी मारल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच एसीचे बाहेरचे युनिट त्यांच्या अंगावर पडले, त्यात दोघेही जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी जितेशला मृत घोषित केले; तर प्रांशुला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट मालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. एसीच्या आऊटडोर युनिटचं स्टँड मोडल्यानं ही घटना घडल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली.
© IE Online Media Services (P) Ltd