सध्या सोशल मीडियावर वाराणसीमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्यावर पाणी तुंबल्याचं दिसत असून अनेक लोक पाण्यातून ये-जा करत आहेत. या वेळी विजेच्या खांबातून पाण्यात पसरलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका चिमुकल्याला विजेचा धक्का बसल्याचं दिसत आहे. विजेचा धक्का लागल्याने तो जमीनीवर तडफडत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तर या मुलाच्या मदतीसाठी दोन वयस्कर व्यक्ती देवदूत बनून आल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. व्हायरल व्हिडीओतील दृश्य खूप थरारक आणि अंगावर काटा आणणारं आहे.
व्हिडीओत विजेचा धक्का बसल्यामुळे लहान मुलगा जमिनीवर कोसळतो यावेळी एक वयस्कर व्यक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओतील वृद्ध सुरुवातीला मुलाजवळ जाताच त्यांनाही विजेचा धक्का बसतो. यावेळी आणखी एक वयस्कर व्यक्ती तिथे येऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू करते. पाण्यात करंट उतरल्यामुळे त्यांना मुलाजवळ जाता येत नसल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती या वृद्धाच्या हातात लाकडी काठी देतो. तिच काठी ते मुलाच्या हातात देतात आणि त्याला पाण्यातून बाहेर ओढतात.
वृद्धांच्या प्रयत्नांमुळे वाचले मुलाचे प्राण –
व्हिडीओमध्ये, विजेच्या धक्क्यामुळे मुलाच्या हातातील लाकडी काठी सुरुवातीला खाली पडल्याचं दिसत आहे. पण पुन्हा तो काठी पकडतो आणि आजोबा त्याला पाण्यातून सुखरुप बाहेर काढतात. या दोन वृद्धांनी मुलाचे प्राण वाचवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी दोन्ही वयस्कर व्यक्तींचे खूप कौतुक करत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
एका व्यक्तीने लिहिलं, “माझ्या बनारस शहरात असे चांगले लोक आहेत जे स्वत:च्या जीवाला धोका असूनही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी धावून जातात.” रवी नावाच्या एका ट्विटर यूजरने लिहिलं, “नाही नाही, हे वाराणसी नाही. वाराणसी हा पंतप्रधानांचा संसदीय मतदारसंघ आहे. अशी घटना तिथे घडू शकत नाही.” संकेत उपाध्याय यांनी लिहिलं, “देवदूत आहेत. ते आपल्या आजूबाजूला असतात. या वृद्धांना माझा विनम्र अभिवादन.” हे प्रकरण चेतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती समोर आली आहे. तर या घटनेनंतर वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर मुलाचे कुटुंबीय म्हणाले, “दोन्ही वयस्कर व्यक्ती देवदूतांसारखे धावून आले आणि मुलाचे प्राण वाचवले. त्यांचे मनापासून आभार”