भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा समूहाचे अध्यक्ष ‘आनंद महिंद्रा’ विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बऱ्याचदा त्यांच्या पोस्टमधून मजेशीर, जुगाड व्हिडीओ व अनेक प्रेरणादायी गोष्टी शेअर करत असतात; ज्या नेहमीच अनेकांच लक्ष वेधून घेत असतात. तसेच आनंद महिंद्रा विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला थार किंवा त्यांच्या खास गाड्या भेटवस्तू म्हणून देत असतात. तर आज आनंद महिंद्रांनी एका बुद्धिबळपटूच्या कुटुंबाला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे.
भारताचा १८ वर्षीय आर प्रज्ञानंदने बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेत ३२ वर्षांच्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन बरोबर तोडीस तोड खेळून त्याने अनेक भारतीयांची मने जिंकली होती, तर प्रज्ञानंदची कामगिरी पाहता आनंद महिंद्रानीही त्याचे कौतुक केले होते. तेव्हा अनेक नेटकऱ्यांनी आनंद महिंद्रांकडे प्रज्ञानंदला थार देण्याची मागणी केली होती.
पोस्ट नक्की बघा :
तेव्हा आनंद महिंद्रा यांनी २८ ऑगस्ट २०२३ रोजी एक पोस्ट शेअर करीत लिहिले होते की, “मी तुमच्या भावनांची कदर करतो. अनेक जण मला प्रज्ञानंदला एक थार भेट देण्याचा आग्रह करत आहेत.पण, माझ्या डोक्यात दुसरी कल्पना आहे. मी प्रज्ञानंदच्या पालकांचे कौतुक करतो, कारण त्यांनी मुलांना बुद्धिबळ या खेळाची ओळख करून दिली. व्हिडीओ गेमची लोकप्रियता वाढत असताना त्यांनी बुद्धिबळ या खेळास पाठिंबा दिला. त्यामुळे ईव्हीएस (EVs) प्रमाणेच ही आपल्या चांगल्या भविष्यासाठी केलेली एक गुंतवणूक आहे आणि म्हणून मला वाटते की, आपण प्रज्ञानंदच्या पालकांना एक XUV4OO EV भेट दिली पाहिजे. प्रज्ञानंदचे आई-वडील नागलक्ष्मी आणि रमेशबाबू यांना मुलाची आवड जोपासल्याबद्दल आणि त्याला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कृतज्ञतेला पात्र आहेत; अशी त्यांनी कॅप्शन दिली होती.
तर आज आनंद महिंद्रांनी दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. प्रज्ञानंदने एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @rpraggnachess या अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये शोरूममधील कर्मचारी मिळून प्रज्ञानंद व त्याच्या कुटुंबाला आनंद महिंद्रा यांनी दिलेली कार भेट देताना दिसत आहेत. हा क्षण प्रज्ञानंद व त्याच्या कुटुंबासाठी खूपच खास आहे. तर या खास क्षणाबद्दल व्यक्त होताना प्रज्ञानंदने लिहिले की, “एक्सयूव्ही ४०० ( XUV 400) मिळाली. माझे पालक खूप आनंदी आहेत. खूप खूप धन्यवाद, आनंद महिंद्रा सर @anandmahindra”, अशी कॅप्शन प्रज्ञानंदने या पोस्टला दिली आहे. ही पोस्ट पाहून अनेक नेटकरी आनंद महिंद्रा यांचे कौतुक, तर प्रज्ञानंद व त्याच्या कुटुंबाचे अभिनंदन करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.