girl painting 15 portraits at once viral video: वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटरवर फारच सक्रीय आहेत. अनेकदा ते वेगवेगळ्या बातम्यांवर ट्विटरवरुन व्यक्त होताना दिसतात. याच माध्यमातून ते अनेक हटके संकल्पना राबवणाऱ्यांसाठी मदतीचा हातही पुढे करतात. अशीच एक मदत आता त्यांनी एका कलाकार तरुणीला देऊ केली आहे. आनंद महिंद्रांनी या तरुणीची कला पाहून तिला थेट शिष्यवृत्ती देऊ केली आहे.

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या चित्रकलेचं भन्नाट कौशल्य दाखवताना दिसत आहे. व्हिडीओमधील कलाकार तरुणीने विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे असा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमधील व्हॉइस ओव्हर देणाऱ्या व्यक्तीने या मुलीने आपल्याकडे विश्वविक्रम करण्यासाठी मदत मागितल्याचा संदर्भ दिला आहे. “हा एकदम अनोखा विश्वविक्रम आहे. काही दिवसांपूर्वी ही मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली सर मला विश्वविक्रम करायचा आहे. मला वाटलं गावातील मुलगी आहे ही काय विश्वविक्रम करणार. मी तिला कोणता विक्रम करणार असं विचारलं असता तिने दिलेलं उत्तर ऐकून मी थक्क झालो,” असं व्हिडीओतील व्हॉइस ओव्हरमध्ये म्हटलं आहे. एका हाताने एकाच वेळी मी १५ थोर व्यक्तींचे चित्रं काढणार आहे असं या मुलीने दावा केला तेव्हा हे शक्य नाही असं वाटतं होतं. हे आव्हान जगात कोणालाच जमलं नाही त्यामुळे ही मुलगी कसं करणार हे असं वाटत असतानाच या मुलीने हे अशक्य काम करुन दाखवलं. हा व्हिडीओ शेअर करुन या मुलीला समर्थन द्या असं आवाहन व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने केलं आहे.

व्हिडीओमध्ये ही मुलगी एका मोठ्या टेबलवर प्रत्येकी पाच चित्रं एका ओळीत अशापद्धतीने मांडणी करुन लाकडी पट्ट्यांना पेन बांधून चित्रं साकारताना दिसत आहे. हा व्हिडीओ फास्ट फॉरवर्डमध्ये आहे. त्यामुळे ती अवघ्या काही सेकंदांमध्ये एकाच वेळी १५ महापुरुषांचं चित्रं पूर्ण करताना दिसते.

तिने काढलेल्या चित्रांमध्ये लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, डॉ. आंबेडकर, वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, झाशीची राणी, महात्मा गांधी, सरदार वल्लभाई पटेल, स्वामी विवेकानंद यासारख्या १५ महापुरुषांची चित्रं आहेत.

या मुलीची कला पाहून आनंद महिंद्राही थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करताना आनंद महिंद्रांनी, “हे कसं शक्य आहे? तिच्यामध्ये कौशल्य आहे तर नक्की. मात्र १५ पोट्रेट काढणं हे कलेपेक्षाही फार मोठं कौशल्य आहे. हा चमत्कारच आहे!” असं म्हटलं आहे. तसेच या ट्वीटमध्ये पुढे, “मला कोणी या मुलीच्या आसपास राहणारं याबद्दलची अधिक माहिती देऊन हे खरं आहे का याबद्दलचा दुजोरा देऊ शकतं का? हे खरं असेल तर तिला प्रोत्साहन द्यायला हवं. मी तिला शिष्यवृत्ती आणि इतर पद्धतीची आवश्यक ती सर्व मदत देण्यास इच्छूक आहे,” असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे.

आनंद महिंद्रांनी यापूर्वीही अशाप्रकारे अनेकांना आर्थिक मदत केलेली आहे. त्यामुळे आता आनंद महिंद्रांना या मुलीपर्यंत पोहचता येतं का आणि ते तिला काय मदत करतात हे येणाऱ्या काळाताच कळेल.

Story img Loader